श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:46 IST2025-11-18T11:46:32+5:302025-11-18T11:46:54+5:30
या चोरीच्या नेटवर्कमधील मास्टरमाईंड जयसिंहशिवाय २ साथीदार, ३ बाईक खरेदीदार यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
कोरबा - ही कहाणी आहे अशा चोराची, जो मागील १० वर्षापासून घरातून गायब होता. तो जंगलात राहायचा. जसा तो बाहेर यायचा, बाईक चोरी करायचा. त्यानंतर पुन्हा जंगलात जाऊन लपायचा. स्वत:ला श्रीमंत असल्याचं भासवत त्याने ६ गर्लफ्रेंडही बनवल्या होत्या. मात्र आता छत्तीसगडच्या कोरबा पोलिसांनी त्याला अटक करून संपूर्ण चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
या चोराचं नाव जयसिंह पटेल असं आहे. माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पोलिसांना खदान येथून रोलर चोरी झाल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासात एक व्यक्ती खदानीजवळील जंगलात झाडीझुडपात झोपडी बनवून राहत असल्याचं पुढे आले. तपासात युवकाने आपले नाव जयसिंह पटेल असल्याचं सांगितले. ना त्याच्याकडे आधार कार्ड होते, ना कुठलेही अन्य कागदपत्रे होती. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली.
या चौकशीत जयसिंहने खुलासा केला की, मी माझ्या २ साथीदारांसोबत मिळून बाईक चोरीचं नेटवर्क उभे केले होते. हे लोक आधी रेकी करायचे, त्यानंतर संधी मिळताच बाईक चोरी करत होते. चोरी केलेली बाईक स्वस्त दरात विविध खरेदीदारांना विकायचे. जयसिंहने खदान येथील रोलर चोरीसोबतच दीपका, सर्वमंगला चौकी यासह इतर अनेक ठिकाणी चोरीच्या घटना केल्याचे उघड झाले. तो त्याच्या कुटुंबापासून मागील १० वर्षापासून गायब आहे. त्याचा मृत्यू झालाय असं घरच्यांना वाटत होते.
पोलीस अधिकारी काय बोलले?
या चोरीच्या नेटवर्कमधील मास्टरमाईंड जयसिंहशिवाय २ साथीदार, ३ बाईक खरेदीदार यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींमध्ये अनस खान, शिवचरण, रामप्रसाद, लालजी यादव, इमरान अंसारी यांचा समावेश आहे. या टोळीकडून एकूण १४ चोरीच्या बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस या चोरांपासून अनेक काही धागेदोरे मिळतायेत का याचा शोध घेत आहेत. अटकेतील आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पोलीस या टोळीतील नेटवर्कचा पर्दाफाश करत आणखी किती जण यात सहभागी आहेत याचा शोध घेत आहेत.