Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:08 IST2025-06-24T14:07:48+5:302025-06-24T14:08:13+5:30
Chhattisgarh Crime News: पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, तपास सुरू केला आहे.

Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
Raipur Crime: काही दिवसांपूर्वी नीळ्या ड्रमचे प्रकरण खूप चर्चेत होते. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह नीळ्या ड्रममध्ये भरुन, त्यात सिमेंट टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आता तशाच प्रकारची घटना छत्तीसगडच्या रायपूरमध्ये घडली आहे. येथील डीडी नगर पोलिस स्टेशन परिसरात सोमवारी सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. हा मृतदेह सीमेंटमध्ये भरण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका रिकाम्या प्लॉवर एक लोखंडी पेटी बेवारस अवस्थेत आढळली. स्थानिकांनी ती पेटी उघडली असता, त्यात एक लाल रंगाची सुटकेस होती. त्या सुटेकसमध्ये सिमेंट भरण्यात आले होते. ते सीमेंट फोडले असता, त्यात कुजलेला अवस्थेतील एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेह ४ ते ५ दिवस जुना होता अन् सिमेंटमध्ये पूर्णपणे गोठलेला होता.
मृताची ओळख पटली नाही
याबाबत माहिती मिळताच उच्च पदस्थ पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही, पोलिस शोध घेत आहेत. मृतदेहाची स्थिती आणि तो ज्या पद्धतीने लपवण्यात आला होता, ते पाहता हा पूर्वनियोजित खून असल्याचे दिसते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.