OLXवर गाडया खरेदी करताय पण सावधान; चोरीच्या गाडया विकणारी दुकली गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 21:13 IST2022-07-20T21:12:17+5:302022-07-20T21:13:09+5:30
Fraud Case : १४ गुन्हयांची उकल, १३ वाहने जप्त

OLXवर गाडया खरेदी करताय पण सावधान; चोरीच्या गाडया विकणारी दुकली गजाआड
कल्याण: एकिकडे ओ एल एक्सवर वस्तू खरेदी आणि विक्रीचे फॅड वाढले असताना दुसरीकडे वाहन चोरी करून त्यांची ओ एल एक्सच्या माध्यमातून विक्री करणा-या दोघा चोरटयांना महात्मा फुले चौक पोलिसांनीअटक केली आहे. मोहम्मद अकबर अब्दुल अजीज शेख (वय २७) आणि अबुबकर उर्फ जुनेद उर्फ जाफर अब्दुल अजीज शेख (वय २३) रा. आडवली गाव, कल्याण पूर्व अशी अटक आरोपींची नावे असून ते दोघे सख्खे भाऊ आहेत. दोघांविरोधात याआधी देखील वाहन चोरीचे १४ गुन्हे दाखल आहेत, या सर्व गुन्हयांची उकल करण्यात आली असून यातील १३ वाहने जप्त केली आहेत. यात बुलेट, दुचाक्या आणि रिक्षांचा समावेश आहे.
पोलिसांना एक व्यक्ती चोरीची बुलेट विकण्यासाठी येथील पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या विशेष पथकांनी सापळा रचत आरोपी मोहम्मद अकबर अब्दुल अजीज शेख याला शिताफीने अटक केली. गुन्हयात ताब्यात घेतलेली बुलेट चोरीची असल्याचे आणि त्याची ओ एल एक्सवर बनावट कागदत्रंच्या आधारे विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. या गुन्हयात त्याला मदत करणारा त्याचा भाऊ अबुबकर उर्फ जुनेद उर्फ जाफर अब्दुल अजीज शेख याला देखील पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, शीळ डायघर, मुंब्रा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ गुन्ह्यांची उकल करीत चोरी केलेली १३ वाहने जप्त केली आहेत.
आरोपी ऑनलाईन विक्रीसाठी असलेले वाहन कॉपी करून हुबेहूब त्याच्या गाडीसारखी दिसणारी गाडी चोरी करायचे यानंतर ख-या गाडीचे ऑनलाईन पेपर मागून घेत त्या कागदपत्रच्या आधारे बनावट पेपर बनवून त्याआधारे किंमत कमी करून या चोरलेल्या गाडयांची विक्री ओ एल एक्सवर करायची या पद्धतीने हे आरोपी गुन्हे करत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली.