Gujarat Crime: क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या वादाचा अंत किती भयानक असू शकतो, याचा प्रत्यय गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आला आहे. घराच्या ओट्यावर बसण्यावरून शेजाऱ्यांसोबत झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या शेजाऱ्यांनी एका ५० वर्षीय व्यक्तीला अंगावर डिझेल ओतून जिवंत जाळले. या क्रूर घटनेत पीडित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथील रोटरी नगर परिसरात ही घटना घडली. करसन माहेश्वरी (५०) असे मृताचे नाव आहे. करसन हे अविवाहित होते आणि आपल्या वृद्ध आईसोबत राहत होते. शुक्रवारी त्यांचा त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या तीन महिला आणि एका पुरुषासोबत घराच्या ओट्यावर बसण्यावरून जोरदार वाद झाला.
बाथरूममध्ये घुसून अंगावर ओतलं डिझेल
हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी करसन यांच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी करसन धावत सुटले आणि जवळच असलेल्या एका बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतले. मात्र, क्रूर आरोपींनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. आरोपींनी बाथरूमचा दरवाजा तोडून त्यांना पकडले आणि त्यांच्या अंगावर डिझेल ओतून आग लावून दिली.
भररस्त्यात धावत सुटले
अंगाला आग लागल्यानंतर करसन जीवाच्या आकांताने घराबाहेर धावत आले. हा भयानक प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी त्यांच्या अंगावर पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने भुज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र शरीर मोठ्या प्रमाणात भाजल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस कारवाई आणि आरोपींचा शोध
मृताचे मोठे भाऊ हिराभाई माहेश्वरी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमिळाबेन, अंजूबेन, मंजूबेन आणि त्यांच्यासोबतचा एक पुरुष साथीदार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. तर एक महिला आरोपी अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : In Gujarat's Kutch, a 50-year-old man was fatally burned after a dispute over sitting outside escalated. Neighbors poured diesel on him and set him ablaze. Three suspects have been arrested; investigation ongoing.
Web Summary : गुजरात के कच्छ में, बाहर बैठने को लेकर हुए विवाद के बाद 50 वर्षीय व्यक्ति को जलाकर मार डाला गया। पड़ोसियों ने उस पर डीजल डालकर आग लगा दी। तीन संदिग्ध गिरफ्तार; जांच जारी है।