burn currency notes worth rupees 5 lakh gas bribe money tehsildar telangana | बाबो! लाच प्रकरणी पकडले जाण्याच्या भीतीने 'त्याने' चक्क गॅसवर जाळल्या 5 लाखांच्या नोटा अन्...

बाबो! लाच प्रकरणी पकडले जाण्याच्या भीतीने 'त्याने' चक्क गॅसवर जाळल्या 5 लाखांच्या नोटा अन्...

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वी एका तहसीलदाराने तब्बल 15 लाख रूपये इतकी रक्कम गॅस शेगडीवर जाळून राख केली होती. एसीबी अर्थात भ्रष्टाचारविरोधी पथकाचे अधिकारी आलेले पाहताच त्याने नोटा जाळून टाकल्या होत्या. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. लाच घेतलेली रक्कम पकडली जाईल या भीतीने एका एका व्यक्तीने तब्बल पाच लाखांची रोकड गॅसवर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या नागरकुर्नूल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. वेलदांडाचा तहसिलदार सैदुलुने वेंकटय्या गौड नावाच्या व्यक्तीला 5 लाख रुपये ठेऊन घ्यायला सांगितले होते. या तहसिलदाराने एका कामाला NOC देण्यासाठी संबंधिताकडून ही पाच लाखांची रक्कम लाच म्हणून घेतली होती. एसीबीला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घरी छापा टाकला. दारावर एसीबीचे अधिकारी आल्याचं पाहून तो खूप घाबरला. 

लाच प्रकरणामुळे एसीबीच्या जाळ्यात अडकू या भीतीने त्याने गॅसवर तब्बल पाच लाखांची रोकड जाळल्याचा प्रयत्न केला. पण पुरावे नष्ट करण्याचा त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. तो शेवटी पकडला गेलाच. भ्रष्टाचारविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पाच लाखांच्या रकमेतील तब्बल 92 हजार रुपयांच्या 2 हजाराच्या 46 नोटा पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तसेच 500 रुपयांच्या आणि दोन हजार रुपयांच्या काही नोटा काही प्रमाणात जळालेल्या अवस्थेत एसीबीच्या अधिकाऱ्यांना सापडल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


Web Title: burn currency notes worth rupees 5 lakh gas bribe money tehsildar telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.