बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांत नववधू बॉयफ्रेंडसह आठ लाखांचे दागिने आणि दोन लाखांची कॅश घेऊन पळून गेली. हे प्रकरण काजी मोहम्मदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नवरदेव राहुल कुमारने सांगितलं की, २५ नोव्हेंबर रोजी वैशाली जिल्ह्यातील गंगाब्रिज पोलीस स्टेशन परिसरातील एका मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर सर्व काही सुरळीत असताना, ५ डिसेंबर रोजी दुपारी राहुल कामावर गेला आणि त्याची आई भाजी घेण्यासाठी बाजारात गेली होती. याचदरम्यान नववधू दागिने आणि रोख रक्कम घेऊन घरातून पळून गेली.
राहुलची आई परत आली तेव्हा सून घरी नव्हती. घरामध्ये पाहिलं असता लग्नातील दागिने व घरातील पैसे गायब असल्याचं आढळून आलं. कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये नव्हते. सासूने सुनेचा इकडे-तिकडे शोध घेतला आणि सुनेच्या माहेरी देखील फोन केला पण कोणाला काहीच माहीत नव्हतं.
राहुलने शोध घेतला असता, त्याची पत्नी राजापाकड येथील रहिवासी असलेला बॉयफ्रेंड सत्यमसोबत पळून गेल्याचं समजलं. या घटनेनंतर राहुलने काझी मोहम्मदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. डीएसपी सीमा डागर यांनी सांगितलं की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही आणि इतर पुरावाच्या मदतीने नववधू आणि तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेत आहेत.