उत्तर प्रदेशमधून एक अतिशय क्रूर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील कुकरा गावात बलात्कार करून एका महिलेची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हे क्रूर कृत्य तिच्याच प्रियकराने केल्याचे धक्कादायक सत्य आता सगळ्यांसामोर आले आहे. याच गावात राहणाऱ्या प्रियकराने आपल्या मित्रासोबत मिळून या महिलेवर आधी बलात्कार केला आणि नंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या महिलेला गंभीर अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान बुधवारी रात्री एलएलआर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात आक्रोश निर्माण झाला आहे. पोलिसांनी देखील तातडीने कारवाई करत मृत महिलेच्या प्रियकरला आणि त्याच्या मित्राला अटक केली. मृत महिला सासरी वाद झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आपल्या पित्याच्या घरीच राहत होती.
नेमकं प्रकरण काय?
मृत महिला गतीमंद असल्याचे म्हणत तिच्या सासरच्या लोकांनी तिला माहेरी पाठवून दिले होते. ती गेल्या दोन वर्षांपासून कुकरा गावात आपल्या वडिलांच्या घरात राहत होती. या दरम्यान गावातच राहणाऱ्या एका ५० वर्षीय रामबाबू वाल्मिकी नावाच्या व्यक्तीसोबत तिचे सूत जुळले. हळूहळू दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. इतकंच नाही तर, दोघांमध्ये अनैतिक संबंध देखील निर्माण झाले. या नात्यातून तिला दिवस गेले होते. महिला गर्भवती असल्याचे कळताच रामबाबूने तिच्याशी असलेले संबंध तोडून टाकण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या कुटुंबाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच त्यांना रामबाबूने शिवीगाळ केली.
मात्र, रविवारच्या दिवशी रामबाबू आणि त्याचा मित्र या महिलेल्या फूस लावून जवळच्या शेतात घेऊन गेले. त्यांनी आधी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर बळजबरीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खायला लावल्या. यामुळे महिलेची प्रकृती ढासळत गेली. कसंबसं घरी पोहोचून या महिलेने आपली आपबिती कुटुंबाला सांगितली. यानंतर कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत रामबाबू आणि त्याच्या मित्रविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांनी दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली आहे.