‘ब्लॅकमेल’ करुन मुलीला त्रास देणाऱ्या मुलास अटक; लातुरात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: November 18, 2025 20:51 IST2025-11-18T20:50:57+5:302025-11-18T20:51:05+5:30
पिडीत मुलीच्या जबाबानुसार शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. सुप्रीया केंद्र या करीत आहेत.

‘ब्लॅकमेल’ करुन मुलीला त्रास देणाऱ्या मुलास अटक; लातुरात गुन्हा दाखल
- राजकुमार जाेंधळे
लातूर : ब्लॅकमेल करुन मुलीला त्रास देणाऱ्या एका मुलाला दामिनी पथकाने ताब्यात घेत अटक केली असून, ही घटना लातुरात मंगळवारी सकाळी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजता दामीनी पथक गस्तीवर हाेते. त्यांना एका नागरीकाने फोन करून सांगितले, एक महाविद्यालयीन मुलगी रडत असून, एक मुलगा तिला चाकूने हात कापून घेताे आणि तुझे नाव घेतो असे म्हणत त्या मुलाने मुलीस एका हॉटेलमध्ये नेल्याची माहीती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत ८ मिनिटांत दामीनी पथकाने धाव घेतली. घटनास्थळावरुन पिडीत मुलगी आणि आरोपी मुलाला ताब्यात घेत शिवाजीनगर ठाण्यात हजर केले.
पिडीत मुलीकडे याबाबत अधिक चाैकशी केली असता तिने सांगितले की, विशाल वाळासाहेब केकान (रा. केकानबाडी, ता. केज, जि. बीड) हा पिडीतेला व्हॉटसअप आणि फोनद्वारे कॉल, मॅसेज करून त्रास देत असून, आजही त्याने जीव देतो असे म्हणून ब्लॅकमेल केले. अंबाजोगाई रोडवर बोलावून घेत माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यासोबत चल नाही तर मी हात कापून तुझे नाव घेतो. असे म्हणून शिवीगाळ करुन धमकी दिली. याबाबत पिडीत मुलीच्या जबाबानुसार शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. सुप्रीया केंद्र या करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पाेलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहराचे डीवायएसपी समीरसिंह साळवे, शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस निरीक्षक अभिषेक शिंदे, दामीनी पथकातील अंमलदार प्रशांत नागरगोजे, भाग्यश्री झोडपे, पल्लवी चिलगर यांनी केली आहे.
पथकाला काॅल करा; मदतीला येतील पाेलिस...
रस्त्यावर थांबलेल्या एका वाटसरूने प्रसंगाचे गांभीर्य ओळखत दामिनी पथकाला कॉल करून माहीती दिल्याने पुढील अनर्थ टळला आहे. लातुरात रोडरोमीयो आणि टवाळखोरांकडून त्रास होत असल्यास नागरीकांना, मुली-महिलांनी दामीनी पथकाला (मोबाईल क्रमांक ८८३०१ १५४०९) संपर्क करावा. तक्रार देण्याऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन केले आहे.