तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:14 IST2025-12-03T11:13:39+5:302025-12-03T11:14:10+5:30
बरेली येथील पोलीस अधीक्षकांनी या घटनेचा शोध घेण्यासाठी ४ पथके नेमली आहेत. ३ डॉक्टरच्या पॅनलकडून चिमुकल्याच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यात येणार आहे.

तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
बरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली येथे एका लाल रंगाच्या सुटकेसमध्ये ८ ते १० वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे. या सुटकेसमध्ये मृतदेहासोबत चिप्स कुरकुरे आणि चॉकलेटही आहे. हे चित्र पाहून एखाद्या तंत्रमंत्राच्या विद्येमुळे चिमुकल्याची हत्या केल्याचा संशय वाटतो. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.
बरेली येथील पोलीस अधीक्षकांनी या घटनेचा शोध घेण्यासाठी ४ पथके नेमली आहेत. ३ डॉक्टरच्या पॅनलकडून चिमुकल्याच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यात येणार आहे. लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होईल असा दावा अधिकाऱ्यांनी केला. ही घटना दिल्ली लखनऊ राष्ट्रीय महामार्गावरील इज्जत नगर परिसरात घडली आहे. ज्याठिकाणी हायवेपासून २०० मीटर अंतरावर नदीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यात पोलिसांना एक लाल रंगाचा बॉक्स सापडला. या बॉक्समध्ये मृतदेहासोबत कुरकुरे आणि चॉकलेटही होते. इतकेच नाही तर मुलाचे डोळे आणि दातही तुटले होते. तंत्रमंत्रामुळे या मुलाची हत्या केली असावी असा पोलिसांना अंदाज आहे. या मुलाचा मृतदेह नदीत फेकण्यासाठी बॉक्समध्ये भरून आणल्याचा संशय आहे. सध्या पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला आहे.
कसा सापडला मृतदेह?
हायवेवरून जाणाऱ्या लोकांनी सकाळी नदीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एक बॉक्स पाहिला. काही लोकांनी हा बॉक्स उघडून पाहिला तर त्यात एका लहान मुलांचा मृतदेह पाहून ते हैराण झाले. त्यानंतर संबंधित घटनेबाबत पोलिसांना कळवले. शहरातील एसपी मानुष पारीक पोलिसांसह घटनास्थळी पोहचले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरील पुरावे गोळा केले परंतु त्यात विशेष काही मिळाले नाही. स्थानिक गावकऱ्यांना पोलिसांना बोलावले पण मृतदेहाची ओळख पटली नाही. या मुलाचा मृतदेह पाहिला तर त्याच्या डाव्या बाजूचा डोळा काढला होता, मुलाचा मृतदेह विचित्र अवस्थेत ठेवला होता. त्यामुळे एखाद्या मनोवृत्तीने हे केले असावे असं वाटत होते.
दरम्यान, बॉक्समध्ये मुलाचा मृतदेह चादरीत ओढून ठेवला होता. डोक्याखाली छोटी उशीही ठेवली होती. त्याशिवाय विविध ब्रँडचे चिप्स, सोया आणि कुरकुरे होते. मुलाच्या मृतदेहावर किरकोळ जखमा आहेत, हत्येसारख्या गंभीर खूणा नाहीत. डावा डोळा काढला होता. उशीने मुलाचा गळा दाबून खून केला असावा असं पोलिसांना वाटते. परंतु पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर त्यावर पुष्टी मिळेल.