लव्ह मॅरेजचा बदला घेण्यासाठी क्रूरतेचा कळस; मुलाच्या भावाचे नाक कापले, बदल्यात मुलीच्या काकाचा पाय तोडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:51 IST2025-12-19T15:43:11+5:302025-12-19T15:51:34+5:30
लव्ह मॅरेजचा बदला घेण्यासाठी राजस्थानमध्ये दोन कुटुंबांनी रक्तरंजित संघर्ष केल्याची घटना समोर आली आहे.

लव्ह मॅरेजचा बदला घेण्यासाठी क्रूरतेचा कळस; मुलाच्या भावाचे नाक कापले, बदल्यात मुलीच्या काकाचा पाय तोडला
Rajashtan Crime: अडीच वर्षांपूर्वी झालेल्या एका प्रेमविवाहाचा राग मनात धरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षाने राजस्थानमधील बाडमेर जिल्हा हादरला आहे. सूडाच्या भावनेतून मुलीच्या कुटुंबाने मुलाच्या भावाचे नाक कापले. तर प्रत्युत्तर म्हणून मुलाच्या कुटुंबाने मुलीच्या काकाचा पाय कुऱ्हाडीने तोडून टाकला. या सगळ्या क्रूर प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
बाडमेरमधील गुडामालानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिवाणियों की ढाणी गावात ही घटना घडली. गावातील श्रवण सिंह (२५) याने अडीच वर्षांपूर्वी शेजारी राहणाऱ्या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. लग्नानंतर श्रवण आपल्या पत्नीसह गुजरातला स्थायिक झाला, मात्र मागे राहिलेले त्याचे कुटुंब मुलीच्या नातेवाईकांच्या निशाण्यावर होते.
धारदार शस्त्राने कापले नाक
बुधवारी संध्याकाळी श्रवणचा मोठा भाऊ उक सिंह (३५) हा शेतातून घरी परतत होता. यावेळी दबा धरून बसलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी उक सिंहवर हल्ला केला. संतापलेल्या आरोपींनी धारदार शस्त्राने उक सिंहचे नाक कापले आणि तिथून पळ काढला.
प्रत्युत्तरादाखल पाय तोडला
रक्ताळलेल्या अवस्थेत उक सिंह घरी पोहोचल्यावर त्याच्या कुटुंबीयांचा राग अनावर झाला. त्यांनी तातडीने मुलीचे काका धर्म सिंह (५०) यांचे घर गाठले. संतापलेल्या जमावाने धर्म सिंह यांच्यावर हल्ला करत त्यांचा पाय कुऱ्हाडीने तोडून वेगळा केला.
दोघांची प्रकृती चिंताजनक
या भीषण हिंसाचारात दोन्ही बाजूचे लोक गंभीर जखमी झाले आहेत. उक सिंह यांच्यावर सांचौर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर धर्म सिंह त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना जोधपूरला रेफर करण्यात आले आहे.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच गुडामालानी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध क्रॉस केस दाखल करण्यात आली आहे. घटनेनंतर दोन्ही कुटुंबातील आरोपी फरार झाले असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.