आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:26 IST2025-12-08T13:24:52+5:302025-12-08T13:26:54+5:30
सौरभ पाल नावाचा बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार केला आणि या प्रोफाइलद्वारे हरिद्वारमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात सोशल मीडियाशी संबंधित एका गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मंडावर पोलीस स्टेशन परिसरातील खुदाहेरी गावातील फैजान मलिक या तरुणाविरुद्ध बनावट ओळखपत्र वापरून मैत्री केल्याचा, लग्नाचं आश्वासन दिल्याचा आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी सुरू आहे.
रिपोर्टनुसार, आरोपीने सौरभ पाल नावाचा बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार केला आणि या प्रोफाइलद्वारे हरिद्वारमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला. असा आरोप आहे की, त्या तरुणाने स्वतःला तिच्याच समाजाचा असल्याचा दावा करून तिच्याशी मैत्री केली. हळूहळू ते भेटू लागले आणि लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिच्याशी संबंध ठेवले.
एके दिवशी या तरुणाचे आधार कार्ड खाली पडल्याने नवं वळण मिळालं. कार्डवर त्याचं खरं नाव फैजान मलिक लिहिलं होतं. महिलेने याबद्दल चौकशी केली तेव्हा सुरुवातीला तरुणाने आधार कार्डमधील त्रुटीचं कारण सांगितले, परंतु नंतर जेव्हा विरोधाभास निर्माण झाला तेव्हा महिलेला संशय आला. तिने आरोपीच्या ओळखीच्या लोकांकडून माहिती घेतली, ज्यामुळे त्याची खरी ओळख उघड झाली.
तक्रारीत आरोप आहे की, महिला त्याच्यापासून दूर राहिल्याने आरोपी संतापला आणि तिला ब्लॅकमेल करू लागला, तिच्या काही पर्सनल फोटोंचा गैरफायदा घेण्याची धमकी दिली. शिवाय महिलेच्या आरोपांनुसार त्याने तिच्यावर संबंध निर्माण करण्यासाठी दबाव आणला आणि लग्नासाठी तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्नही केला.
या परिस्थितीमुळे व्यथित होऊन महिला तिच्या कुटुंबाकडे आली आणि घटनेची माहिती दिली. तिच्या कुटुंबाने तिला स्योहारा पोलीस ठाण्यात नेलं, जिथे तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तरुणाविरुद्ध फसवणूक, धमकी देणं आणि बनावट ओळखपत्र वापरून ब्लॅकमेल करणं या कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.