"मुलाकडून चूक, एन्काऊंटर नको"; सुनील पाल अपहरणातील आरोपीसह पोलीस ठाण्यात आली आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 18:11 IST2024-12-25T18:10:50+5:302024-12-25T18:11:41+5:30
कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणात सामील असलेल्या गँगचा सदस्य शुभम आपल्या आईसह बिजनौर पोलीस ठाण्यात पोहोचला.

फोटो - आजतक
बिजनौरमध्ये यूपी पोलिसांच्या सततच्या एन्काऊंटरमुळे गुन्हेगारांमध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की, ते स्वत:ला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण करत आहेत. चित्रपट अभिनेता मुस्ताक खान आणि कॉमेडियन सुनील पाल यांच्या अपहरणात सामील असलेल्या गँगचा सदस्य शुभम आपल्या आईसह बिजनौर पोलीस ठाण्यात पोहोचला.
शुभमवर ५० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं असून पोलीस गेल्या २२ दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. एन्काऊंटरच्या भीतीने त्याने आईसोबत पोलीस ठाणे गाठलं. शुभमच्या आईने अश्रू ढाळत पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडे आपल्या मुलाची जीव वाचवण्याची विनंती केली. शुभमच्या आईने सांगितलं की, माझ्या मुलाकडून चूक झाली, त्याला माफ करा, पण त्याचा एन्काऊंटर करू नका.
अलीकडेच गँगमधील इतर सदस्य लवी पाल, आकाश उर्फ गोला आणि अर्जुन कर्णवाल यांना चकमकीनंतर अटक करण्यात आली होती. शुभमच्या आईच्या आवाहनानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी बिजनौर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी एसपी सिटी संजीव वाजपेयी यांनी सांगितलं की, मेरठमधील चित्रपट अभिनेता मुस्ताक खान आणि कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण केल्याप्रकरणी शुभमचं नाव आहे. मेरठ आणि बिजनौर पोलीस त्याचा शोध घेत होते. मेरठमध्ये शुभमवर २५ हजार आणि बिजनौरमध्ये २५ हजारचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. बुधवारी तो स्वत: पोलीस ठाण्यात आला आणि आत्मसमर्पण केलं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
कॉमेडियन सुनील पाल आणि चित्रपट अभिनेता मुस्ताक खान यांचं अपहरण करणाऱ्या गँगमध्ये एकूण १० जण सामील होते. यामध्ये बिजनौर पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून दोन जणांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. लवी आणि आकाश उर्फ गोलाच्या पायाला गोळी लागली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.