Bihar Crime:बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांना चेटकीण असल्याच्या संशयावरुन मारहाण करुन जिवंत जाळण्यात आले. ही खळबळजनक घटना मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील तेटगामा गावातील आहे. गावातील रामदेव ओरांव यांच्या मुलाचा भूतबाधा विधीदरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलाची तब्येत बिघडत चालली होती. यामुळेच गावकऱ्यांनी त्या कुटुंबाला ठार मारले.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबूलाल ओरांव, सीता देवी, मनजीत ओरांव, रानिया देवी आणि तपतो मोसमत यांना गावकऱ्यांनी आधी जबर मारहाण केली, त्यानंतर जिवंत जाळून ठार मारले. मृत सर्व एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण असून, लोक घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नकुल कुमारला अटक केली आहे. त्याच्यावर संबंधित कुटुंबाला जिवंत जाळण्यासाठी जमावाला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या घटनेतून वाचलेल्या मृताचा एकमेव वारस ललित कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला चेटकीण असल्याच्या संशयावरुन जाळण्यात आले आहे. तसेच, हत्येनंतर मृतदेह नदीत फेकण्यात आले. एसपी स्वीटी सेहरावत म्हणाल्या की, ही घटना रविवारी रात्रीच्या वेळेस घडली आदिवासीबहुल भागात घडली आहे.