दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:23 IST2025-11-21T15:18:52+5:302025-11-21T15:23:03+5:30
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी मुझम्मिल शकीलने फरीदाबाद येथे भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याने खोलीत घरघंटीच्या मदतीने यूरिया बारीक करायचा

दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटाबाबत तपास यंत्रणांना मोठा पुरावा सापडला आहे. अटकेत असलेला दहशतवादी मुझम्मिल शकील गनईने स्फोटक तयार करण्यासाठी पिठाची गिरणी आणि इलेक्ट्रिक मशीनचा वापर केला होता. तपासात पोलिसांना हरियाणाच्या फरीदाबाद येथे एका टॅक्सी ड्रायव्हरच्या घरी ही गिरणी आणि मशीन सापडली आहे.
फरीदाबाद येथे भाड्याच्या खोलीत बनवली जात होती स्फोटके
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी मुझम्मिल शकीलने फरीदाबाद येथे भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याने खोलीत घरघंटीच्या मदतीने यूरिया बारीक करायचा. त्यानंतर इलेक्ट्रिक मशीनमधून त्याला रिफाइन करून त्यातून केमिकल तयार करत होता. ९ नोव्हेंबरला पोलिसांना याच जागी ३६० किलो अमोनियम नाइट्रेट आणि अन्य स्फोटके सापडली होती. आता इतक्या दिवसांच्या चौकशीनंतर मुझम्मिल शकीलने तो अमोनियम नाइट्रेट यूरियातून वेगळे करून स्फोटके कशी तयार करत होता त्याचा खुलासा केला आहे. तो फरीदाबाद येथील अल फलाह यूनिवर्सिटीत डॉक्टर होता.
टॅक्सी ड्रायव्हरही ताब्यात, NIA ची चौकशी सुरू
NIA च्या टीमने फरीदाबाद येथील त्या टॅक्सी ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे ज्याच्या घरातून हे साहित्य सापडले. जवळपास ४ वर्षापूर्वी टॅक्सी ड्रायव्हरची आणि मुझम्मिल शकीलची ओळख झाली होती. टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची तब्येत खराब होती त्याच्या उपचारासाठी तो अल फलाह मेडिकल कॉलेजला गेला होता.
दरम्यान, लाल किल्ल्याजवळ आय २० कारमध्ये आत्मघाती हल्ला झाला. त्यात १५ लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दहशतवादी हल्लेखोर उमर नबी मारला गेला. तो काश्मीरचा राहणारा होता. तोदेखील अल फलाह यूनिवर्सिटीशी जोडलेला होता. स्फोटाच्या काही तास आधी जम्मू काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद आणि अल कायदाशी निगडित एका व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. ज्यात २९०० किलो स्फोटके सापडली होती. यात अमोनियम नाइट्रेटचा समावेश होता. दिल्ली स्फोटात त्याचा वापर केल्याचे बोलले जाते.