बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याला ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी अटक, रिक्षाला धडक देऊन होत होता फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 16:09 IST2018-09-25T15:32:57+5:302018-09-25T16:09:35+5:30
खारमध्ये राहणारे जेनिता गांधी आणि गौरव चुघ हे दोघे रिक्षानं घरी जात असताना हा अपघात घडला. दलीप यांच्या गाडीनं मागून जोरात धडक दिल्यानं रिक्षातील हे दोन प्रवाशी जखमी झाले. अपघात घडल्यानंतर दलीप यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु गणपती विसर्जनाच्या गर्दीमुळं ते फार दूर जाऊ शकले नाही.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याला ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी अटक, रिक्षाला धडक देऊन होत होता फरार
मुंबई - बॉलिवूडमधील एका ज्येष्ठ अभिनेत्याने रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत त्याची गाडी एका रिक्षाला ठोकली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी जखमी झाले. त्यानंतर हा अभिनेता घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे त्याला पळ काढता आला नाही आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडला. दलीप ताहिल असे या ज्येष्ठ अभिनेत्याचे नाव असून त्याने बॉलिवूडमध्ये 'बाजीगर', 'राजा', 'इश्क' सारख्या गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत.
रविवारी रात्री दारूच्या नशेत गाडी चालवताना दलीप यांच्या गाडीनं रिक्षाला धडक दिल्यानं दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली असून खारमध्ये राहणारे जेनिता गांधी आणि गौरव चुघ हे दोघे रिक्षानं घरी जात असताना हा अपघात घडला. दलीप यांच्या गाडीनं मागून जोरात धडक दिल्यानं रिक्षातील हे दोन प्रवाशी जखमी झाले. अपघात घडल्यानंतर दलीप यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु गणपती विसर्जनाच्या गर्दीमुळं ते फार दूर जाऊ शकले नाही. रिक्षातील जखमी प्रवाशांनी दलीप यांची कार अडवून त्यांना बाहेर येण्यास सांगितलं. मात्र, दलीप यांनी त्यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. यानंतर रिक्षातील जखमी प्रवाशांनी पोलिसांनी पाचारण केले. त्यानंतर खार पोलिस ठाण्यातील काही पोलिस घटनास्थळी आले आणि चौकशी करण्यात आली. चौकशी केल्यानंतर दलीप हे कार चालवत असल्याचं समोर आल्यानंतर पेलिसांनी दलीप यांना अटक केली. अटक केल्यानंतर दलीप यांना जामीन मिळाल्याचंही खार पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांनी सांगितलं.