बदला घेण्यासाठी अख्खं कुटुंब बनवत होतं बॉम्ब; भीषण स्फोटात गुन्हेगारासह आईचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:29 IST2026-02-16T16:21:15+5:302026-02-16T16:29:00+5:30
भुवनेश्वरमध्ये एअरफील्ड परिसरात राहणारा शाहनवाज मलिक हा त्याच्या घराच्या छतावर बॉम्ब बनवत होता.

बदला घेण्यासाठी अख्खं कुटुंब बनवत होतं बॉम्ब; भीषण स्फोटात गुन्हेगारासह आईचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद
Bhubaneswar Blast: ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या शत्रूचा बदला घेण्यासाठी घराच्या छतावर देशी बॉम्ब बनवत असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या आईचा मृत्यू झाला असून, त्याची होणारी पत्नी आणि मित्र मृत्यूशी झुंज देत आहेत. या संपूर्ण घटनेचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
२७ जानेवारी रोजी संध्याकाळी सुंदरपडा भागातील आझाद नगरमध्ये हा स्फोट झाला. शहनवाज मलिक नावाचा हिस्ट्रीशीटर गुन्हेगार आपल्या घराच्या छतावर बसून देशी बॉम्ब तयार करत होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची आई लिलातुन बीबी, होणारी पत्नी तृप्तिमयी महल (२३) आणि मित्र अमिया मल्लिक (२७) हे देखील उपस्थित होते. बॉम्ब बनवत असतानाच अचानक मोठा स्फोट झाला आणि छतावर आगीच्या ज्वाळा उसळल्या.
CCTV फुटेजमधील थरार
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, छतावर पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या आहेत. अचानक एका महिलेच्या हसण्याचा आवाज येतो आणि दुसऱ्याच क्षणी मोठा स्फोट होतो. स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. स्फोटानंतर जखमी झालेले लोक जीवाच्या आकांताने इकडे तिकडे धावताना दिसले. शहनवाज आगीने होरपळल्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पाण्याच्या टाकीचा आधार घेताना फुटेजमध्ये कैद झाला आहे.
दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
या दुर्घटनेत चौघेही गंभीररीत्या भाजले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मुख्य आरोपी शहनवाज मलिक उर्फ मफ्फी याचा ४ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी त्याच्या आईचाही मृत्यू झाला. तृप्तिमयी आणि अमिया यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूडाच्या भावनेतून बनवत होते बॉम्ब
पोलीस तपासात समोर आले आहे की, शहनवाज मलिक हा एक सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे किमान ७ गुन्हे दाखल होते. कुणासोबत तरी जुना हिशोब चुकता करण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी तो हे घातक बॉम्ब बनवत होता. मात्र त्याच्याच कृत्यात त्याचा व त्याच्या आईचा बळी गेला.
एनआयएकडून तपास सुरू
घटनेचे गांभीर्य आणि स्फोटकांची तीव्रता पाहता, राष्ट्रीय तपास संस्थेने या प्रकरणाची दखल घेतली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावरून गनपावडर आणि मातीचे नमुने गोळा केले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. हा स्फोट केवळ निष्काळजीपणामुळे झाला की यामागे काही मोठे षडयंत्र होते, याचा तपास आता एनआयए आणि स्थानिक पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण भुवनेश्वर शहरात खळबळ माजली असून, परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत.