खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:22 IST2025-12-23T11:20:41+5:302025-12-23T11:22:01+5:30
पोलीस एन्काऊंटरमध्ये जखमी झालेला आणि २५ हजार रुपयांचं बक्षीस असलेला आरोपी शिवम भारती याला न्यायालयात हजर केल्यानंतर फरार झाला.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील भदोही येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एन्काऊंटरमध्ये जखमी झालेला एक आरोपी फरार झाला. ज्या गुन्हेगाराला पोलिसांनी पायात गोळी मारून अटक केली होती, तो काही तासांनंतर पसार झाल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली.
पोलीस एन्काऊंटरमध्ये जखमी झालेला आणि २५ हजार रुपयांचं बक्षीस असलेला आरोपी शिवम भारती याला न्यायालयात हजर केल्यानंतर फरार झाला. आरोपी न्यायालय परिसरातच कुठेतरी लपला असावा, असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर मोठ्या परिश्रमानंतर रात्री उशिरा त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक अभिमन्यु मांगलिक यांनी माहिती दिली की, अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. हजेरीनंतर त्याला पुन्हा पोलीस वाहनाकडे आणल जात असताना, संधी साधून तो तिथून गायब झाला. यानंतर तातडीने संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली.
मोबाईल लूट आणि चाकू हल्ल्याच्या प्रकरणांमधील आरोपी शिवम भारती याला औराई पोलीस आणि एसओजी (SOG) पथकाने अटक केली होती. पोलिसांनी असा दावा केला आहे की, शिवमने पोलिसांवर गोळीबार केला, त्यानंतर स्वरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं, मात्र तिथून तो पळून जाण्यात यशस्वी झाला.