फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 14:54 IST2025-10-22T14:52:18+5:302025-10-22T14:54:14+5:30
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असावी...

फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगलोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका भाड्याच्या घरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका तरुण जोडप्याचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांना भांडणानंतर आत्महत्येचा संशय आहे. २५ वर्षीय सीमा नायक आणि २३ वर्षीय राकेश नायक, अशी या मृतांची नावे आहेत. हे दोघेही मुळचे ओडिशाचे आहेत. राकेश येथे एका सिक्योरिटी फर्ममध्ये काम करत होता, तर सीमा एका सुपरमार्केटमध्ये नोकरीला होती.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असावी. सोमवारी शेजाऱ्यांना बंद घरातून दुर्गंधी येऊ लागली. यातच संबंधित घरात काही हालचालही नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर मनात काही संशय आल्याने त्यांनी खिडकी तोडली, तर त्यांना एक जोडपे मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासात राकेशला दारूचे व्यसन असल्याचे आणि यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे समोर आले आहे.
महत्वाचे म्हणजे, याच घरात राहणारा जोडप्याचा मित्र शुक्रवारी भांडणानंतर घर सोडून गेला होता. दरम्यान, राकेशने भांडणानंतर आत्महत्या केली असावी आणि नंतर सीमानेही आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.