सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:44 IST2025-07-04T15:44:04+5:302025-07-04T15:44:57+5:30

जुन्या कर्जावरून झालेल्या भांडणामुळे धक्कादायक घटना समोर आली आहे. उधार दिलेले पैसे मागितले म्हणून घर पेटवून देण्यात आलं आहे.

bengaluru venkataramani demanded return of 5 lakh subramani and parvati together poured petrol at house and set it on fire | सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video

AI फोटो

बंगळुरूमध्ये जुन्या कर्जावरून झालेल्या भांडणामुळे धक्कादायक घटना समोर आली आहे. उधार दिलेले पैसे मागितले म्हणून घर पेटवून देण्यात आलं आहे. १ जुलै २०२५ रोजी ही धक्कादायक घटना घडली. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकटरमणीची नातेवाईक पार्वती हिने सुमारे ७-८ वर्षांपूर्वी तिची मुलगी महालक्ष्मीच्या लग्नासाठी तब्बल ५ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. अनेक वेळा आठवण करून देऊनही, ही रक्कम अद्याप परत केलेली नाही.

एका कौटुंबिक लग्न समारंभात, जेव्हा वेंकटरमणीने पुन्हा एकदा पैसे मागितले तेव्हा पार्वती संतापली. असा आरोप आहे की पार्वतीने तिचा भाऊ सुब्रमणीसोबत वेंकटरमणीच्या संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा भयानक कट रचला.

१ जुलै रोजी संध्याकाळी सुब्रमणी आणि पार्वती यांनी मिळून वेंकटरमणीच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावली. त्यावेळी वेंकटरमणी आणि त्यांचा मुलगा मोहन दास घरात उपस्थित होते. स्थानिकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून दोघांनाही वेळीच वाचवण्यात आलं. दोघेही बचावले असले तरी घराचा पुढचा भाग आणि खिडक्या आगीत जळून खाक झाला आहे. 

वेंकटरमणी यांचा दुसरा मुलगा सतीश याने विवेकनगर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी सुब्रमणी, पार्वती आणि महालक्ष्मी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी सध्या फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: bengaluru venkataramani demanded return of 5 lakh subramani and parvati together poured petrol at house and set it on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.