बंगळुरू हादरले! उच्चशिक्षित मुलानेच केला निवृत्त नौदल अधिकारी पिता आणि डॉक्टर आईची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:12 IST2026-02-12T10:51:17+5:302026-02-12T11:12:14+5:30
बंगळुरुत एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये मुलानेच आई वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बंगळुरू हादरले! उच्चशिक्षित मुलानेच केला निवृत्त नौदल अधिकारी पिता आणि डॉक्टर आईची हत्या
Bengaluru Crime: बंगळुरुत धक्कादायक घटनेत एका उच्चभ्रू वस्तीत ३३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलाने आपल्या निवृत्त नौदल अधिकारी वडिलांची आणि डेंटिस्ट आईची चाकूने भोसकून हत्या केली. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पूर्व बंगळुरूच्या विग्नान नगर भागात ही थरारक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन चंद्र भट्ट (वय ६०) आणि त्यांची पत्नी डॉ. श्यामला भट्ट (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. नवीन चंद्र हे नौदलातून कॅप्टन पदावरून निवृत्त झाले होते, तर डॉ. श्यामला या व्यवसायाने डेंटिस्ट होत्या. त्यांचा मुलगा रोहन चंद्र भट्ट याने घरगुती वादातून संताप अनावर झाल्याने आपल्या आई वडिलांवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला.
सकाळी ७:३० च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. शेजारीच राहणाऱ्या आणि मणीपाल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. माधवी नायर यांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला. जखमी दाम्पत्याला मणीपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने सकाळी ८:१५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच एचएएल पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. व्हाईटफिल्ड विभागाचे डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा केल्यानंतर आरोपी मुलगा रोहन भट्ट याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले आहे, मात्र नेमका वाद कशामुळे होता याचा शोध पोलीस घेत आहेत.
मणीपाल हॉस्पिटलच्या डॉ. माधवी नायर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली तो अतिशय उच्चभ्रू परिसर आहे. अशा ठिकाणी एका उच्चशिक्षित मुलाने आपल्याच पालकांचा इतक्या क्रूरपणे बळी घेतल्यामुळे शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
"हे कुटुंब अतिशय सुसंस्कृत वाटत होते, त्यांच्या घरातून असा काही प्रकार होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती," अशी प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली.
मृतांचे मृतदेह सध्या बोअरिंग हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. भट्ट दाम्पत्याची मुलगी अमेरिकेत वास्तव्यास असून ती बंगळुरूला येण्यासाठी निघाली आहे. ती आल्यानंतरच मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येईल. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून गुन्ह्याच्या ठिकाणचे न्यायवैद्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.