beat up to youth for sending flood message on Whats App at Paud | पौड येथे पूरपीडितांविषयक मेसेज व्हाटसअ‍ॅपवर पाठविल्याने युवकाला मारहाण

पौड येथे पूरपीडितांविषयक मेसेज व्हाटसअ‍ॅपवर पाठविल्याने युवकाला मारहाण

ठळक मुद्देमारहाण करणारे पाचजण सांगलीचे रहिवाशी : पौड येथील घटना

पुणे :  सांगली जिल्हयातील पूरपीडीत व रहिवाशांविषयीचा मेसेज व्हाटस अँपवर पाठविल्याने एका युवकाला पाचजणांनी मारहाण केली. मारहाण करणारे सर्वजण सांगली येथे राहणारे आहेत. मारहाणीची घटना पौड रस्ता येथे घडली. 
या प्रकरणी गुरूप्रसाद लाड, जगदीश लाड, सूरज लाड, संदीप लाड, आशुतोष लाड (सर्व रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजित उत्तम लाड (वय २२,रा. मोरे श्रमिक वसाहत, कोथरूड) याने यासंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित लाड मूळचा कुंडलचा आहे. लाड पौड रस्ता भागातील मोरे श्रमिक वसाहतीत राहायला आहे. सांगलीतील कुंडल गावातील रहिवाशी युवकाचे लाड सरकार आणि एल ग्रुप हे व्हॉटसअ‍ॅप समुह आहेत. कुंडल गावात आलेल्या पुरानंतर अजित  लाडने गावातील व्हॉटसअ‍ॅप समुहावर काही संदेश पाठविले होते. आमदार साहेब मदत करतात. बाकीचे लाडोबा कुठे गेले,असा संदेश त्याने समुहावर पाठविला होता.
त्यानंतर आरोपी गुरूप्रसाद, जगदीश, सूरज, संदीप, आशुतोष मोटारीतून पहाटे पुण्यात आले. त्यांनी अजितच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तु बदनामी करणारा संदेश का पाठविला? अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर  अजितला त्याने घरातून बोलावून घेतले. पहाटे साडेचारच्या सुमारास अजितला पौड रस्त्यावर नेले. आरोपींनी त्याला तेथे रबरी ट्यूबने बेदम मारहाण केली. माराहाणीत अजितचे कपडे फाटले. त्यानंतर गावात येऊन  आमची माफी मागायची नाही तर तुला मारून टाकू, अशी धमकी देऊन आरोपी मोटारीतून पसार झाले. अजितने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर खटके तपास करत आहेत.

Web Title: beat up to youth for sending flood message on Whats App at Paud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.