मुंबई - पश्चिम उपनगरात भरधाव वेगाने दुचाकीवरुन येऊन रिक्षातील प्रवाश्यांना लुटण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ झाल्याचे समोर आले आहे. दुचाकीवरून येऊन प्रवाश्यांच्या बॅगांवर डल्ला मारणारी टोळी सक्रिय असून प्रकृती मुखर्जी या स्क्रिप्ट रायटर महिलेला दिवाळीत घेतलेला १ लाख २० हजारचा आयफोन गमवावा लागला आहे. याबाबत प्रकृती यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नंतर देखील अंधेरी, जोगेश्वरी परिसरात देखील अशा घटना घडल्या आहेत.
गुरुवारी रात्रीच्या वेळेस विलेपार्ले रेल्वे स्थानकातून सोनिया चांदोरकर या आपल्या सुनेसह सांताक्रूज विमानतळावर निघाल्या होत्या. त्यांनी विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ एका रिक्षाला हात दाखवून रिक्षा थांबवली. मात्र, या रिक्षाने सांताक्रुझ विमानतळावर जाण्याचे १५० रुपये भाडे होणार सांगितले. त्यामुळे चांदोरकर या दुसऱ्या रिक्षाने जाण्यास निघाल्या. काही अंतरावर गेल्यानंतर रिक्षा थांबली. त्याचदरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने चांदोरकर यांच्या हातातील बॅग हिसकावून पोबारा केला. सोनिया चांदोरकर आणि त्यांच्या सुनेने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोर पसार झाले. परंतु त्या दरम्यान त्या चोरांचा पाठलाग करताना इतर रिक्षाचालक देखील चांदोरकर यांच्या रिक्षाचा रस्ता अडवत असल्याचे त्यांच्या कृत्तीतून दिसत असल्याचा संशय सोनिया चांदोरकर यांनी व्यक्त केला आहे.दुचाकीवरुन बॅग पळविणाऱ्या पाच जणांना गेल्या महिन्यात वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यापाऱ्याची सहा लाख रुपयाची रोकड पळविण्याच्या घटनेचा तपास करताना पोलिसांच्या हाती या पाच जणांची टोळी लागली. या पाच जणांचा शोध घेण्यासाठी वर्सोवा पोलिसांनी ५० हून अधिक सीसीटीव्ही फूटेज तपासल्याचे समोर आले आहे.