हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:42 IST2025-07-15T11:41:52+5:302025-07-15T11:42:24+5:30
एका विहिरीत ICICI लोम्बार्डचे मॅनेजर अभिषेक वरुण याचा मृतदेह सापडला आहे.

फोटो - आजतक
पाटणा येथील बेऊर पोलीस स्टेशन परिसरातील एका विहिरीत ICICI लोम्बार्डचे मॅनेजर अभिषेक वरुण याचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अभिषेक गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. बेऊर परिसरातील एका शेतातील विहिरीत आता त्याचा मृतदेह आढळल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांना रस्त्यावर अभिषेकची स्कूटीही सापडली आहे आणि शेतातून चप्पल सापडली, ज्यामुळे त्याची ओळख पटली आहे. अभिषेक हा कंकरबाग परिसरातील आयसीआयसीआय लोम्बार्डच्या ब्रांचमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता.
सीसीटीव्ही फुटेज सापडलं
पोलिसांना घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज देखील सापडलं आहे, ज्यामध्ये अभिषेक रात्री १०:४८ वाजता स्कूटीवर एकटाच जाताना दिसत आहे. फुटेजमध्ये तो मद्यधुंद अवस्थेत पाहायला मिळत आहे.
अभिषेक कुटुंबासह गेलेला पार्टीला
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा कंकरबाग परिसरातील रहिवासी होता. रविवारी रात्री तो रामकृष्ण नगर परिसरात त्याच्या कुटुंबासह एका पार्टीला गेला होता. तिथून त्याची पत्नी आणि मुलं रात्री १० वाजता घरी परतली पण अभिषेक तिथेच थांबला. रात्री १ वाजताच्या सुमारास त्याने त्याच्या पत्नीला फोन करून अपघात झाल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला.