भयावह! आधी अमानुष मारहाण, मग विष पाजलं... बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 14:24 IST2026-01-10T14:23:34+5:302026-01-10T14:24:55+5:30
बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे.

भयावह! आधी अमानुष मारहाण, मग विष पाजलं... बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या
बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. जॉय महापात्रो नावाच्या एका हिंदू तरुणाला आधी अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याला विष पाजण्यात आलं. बांगलादेशातील हिंसक निदर्शनांच्या दरम्यान हिंदूंवर होणारे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या १८ दिवसांत बांगलादेशात ७ हिंदू पुरुषांची हत्या झाली आहे.
८ जानेवारी रोजी सुनामगंज जिल्ह्यातील दिराई उपझिल्ह्यातील भंगदोहोर गावात जॉय महापात्रो या हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, जॉयला आधी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर अमीरुल इस्लाम नावाच्या स्थानिक मुस्लिम व्यक्तीने त्याला विष दिलं. त्यानंतर सिलहट येथील एमएजी उस्मानी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बांगलादेशातील हिंदूंच्या हत्येच्या वाढत्या घटनांनी हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, जेव्हा जेव्हा सरकारची पकड कमकुवत होते, तेव्हा हिंदू अल्पसंख्याकांविरुद्धचा हिंसाचार वाढतो.
कठोर कारवाई करणे आवश्यक
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "आम्ही बांगलादेशात अल्पसंख्याकांसह त्यांच्या घरांवर आणि व्यवसायांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांची चिंताजनक मालिका पाहत आहोत. अशा जातीय घटनांशी तात्काळ आणि कठोरपणे सामना करणं आवश्यक आहे. आम्ही अशा घटनांना वैयक्तिक शत्रूत्व, राजकीय मतभेद किंवा बाह्य कारणांशी जोडण्याची एक चिंताजनक प्रवृत्ती पाहिली आहे. अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारांचं धैर्य वाढतं आणि अल्पसंख्याकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना अधिक गडद होते."
जातीय हिंसाचाराच्या ५१ घटनांची नोंद
'बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषद' (BHBCUC) ने गेल्या महिन्यातच जातीय हिंसाचाराच्या ५१ घटनांची नोंद केली होती. यामध्ये १० हत्या, चोरी आणि दरोड्याची १० प्रकरणे, तसेच घरे, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि मंदिरांवर ताबा मिळवणे, लूटमार आणि जाळपोळ यांच्याशी संबंधित २३ घटनांचा समावेश आहे. याशिवाय, जानेवारी महिन्यात आतापर्यंत आणखी चार हिंदूंची हत्या झाली असून, डिसेंबरपासून मृतांची एकूण संख्या १४ वर पोहोचली आहे.