Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:58 IST2025-12-28T11:57:37+5:302025-12-28T11:58:17+5:30
Dipu Chandra Das : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दीपू चंद्र दासच्या हत्येने संपूर्ण देशात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
बांगलादेशातहिंदू अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दीपू चंद्र दासच्या निर्घृण हत्येने संपूर्ण देशात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून, बांगलादेशातीलहिंदू समुदायाला ज्या दहशतीखाली जगावं लागत आहे, त्याचं उदाहरण आहे. या हत्याप्रकरणातील एका प्रत्यक्षदर्शीने 'NDTV' शी बोलताना धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे. हा हल्ला अचानक झालेला नसून, तो एका नियोजित कटानुसार आणि द्वेषातून करण्यात आल्याचं त्याने सांगितले. "दीपू चंद्र दासची हत्या करणारे लोक माणूस राहिले नव्हते, ते राक्षस बनले होते" असं प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दीपू चंद्र दास हा एक कष्टाळू तरुण होता, मात्र त्याचं हेच यश काही लोकांच्या डोळ्यांत खुपत होतं. ज्या सहकाऱ्यांना नोकरी मिळू शकली नाही, त्यांनी सूडाच्या भावनेने दीपूवर खोटा आरोप लावला. जमावाला भडकवण्यासाठी ही अफवा जाणीवपूर्वक पसरवण्यात आली होती. नंतर प्रशासनानेही स्पष्ट केलं की दीपू चंद्र दास याच्याविरुद्ध ईशनिंदेचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
जबरदस्तीने घेतला राजीनामा
घटनेच्या दिवशी दीपू चंद्र दास याला फॅक्टरीच्या HR विभागात बोलावण्यात आलं. तिथे त्याच्याकडून जबरदस्तीने राजीनामा लिहून घेण्यात आला. प्रत्यक्षदर्शीच्या मते, त्या वेळी तिथे केवळ फॅक्टरीतील कर्मचारीच नव्हते, तर बाहेरून आलेले काही अनोळखी लोकही उपस्थित होते. यानंतर दीपू चंद्र दासला फॅक्टरीच्या गेटबाहेर उभ्या असलेल्या हिंसक जमावासमोर ढकलण्यात आलं. गेटबाहेर कट्टरपंथी आधीच हल्ल्याच्या तयारीत उभे होते.
अमानवीय छळ आणि जिवंत जाळलं
बाहेर येताच जमावाने दीपूवर हल्ला केला. त्याला लाठ्या-काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सतत वार करण्यात आले, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. पण जमावाचे क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दीपू चंद्र दास याला जवळपास एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेण्यात आले, त्यानंतर एका झाडाला बांधून त्याला जिवंत जाळण्यात आले. हे सर्व कृत्य दिवसाढवळ्या सर्वांसमोर घडले, परंतु दहशतीमुळे कोणीही त्याच्या मदतीला पुढे येऊ शकलं नाही.