"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:28 IST2025-09-26T10:27:51+5:302025-09-26T10:28:24+5:30
इतकेच नाही तर एफआयआरमध्ये एका घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात होळीच्या दिवशी स्वामी चैतन्यानंद विद्यार्थिनींना रांगेत उभे करायचा, त्यांना हरी ओम बोलायला लावून समोर वाकवायचा.

"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
नवी दिल्ली - देशाची आर्थिक राजधानी दिल्लीत एका खासगी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलींसोबत झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी, ज्याच्यावर १७ मुलींनी शारीरिक आणि मानसिक छळाचा गंभीर आरोप केला आहे तो सध्या फरार आहे. त्याचे अखेरचे लोकेशन मुंबईत ट्रेस झाले आहे. पोलिसांचे वेगवेगळे पथक त्याला पकडण्यासाठी मागे आहे. तो देशातून पळून जाऊ नये यासाठी लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.
बेबी, आय लव्ह यू...
एफआयआरमध्ये मुलींनी स्वयंघोषित बाबावर गंभीर आरोप केलेत. ६२ वर्षीय स्वामी चैतन्यानंद सरस्वती रात्री उशिरा मुलींना त्यांच्या खोलीत बोलवायचा, मुलींना अश्लील मेसेज पाठवत होता. बेबी, आय लव्ह यू, तू खूप सुंदर आहेस, माझ्या जवळ ये ना...असे मेसेज रात्री मुलींना पाठवत होता. मुलींनी त्याच्या खोलीत जायला नकार दिल्यानंतर तो मॅनेजमेंटच्या सदस्यांवर दबाव आणून मुलींच्या परीक्षेतील मार्क्स कमी करण्याची धमकी द्यायचा. एका विद्यार्थिनीने तिच्या पायाला झालेल्या फ्रॅक्चरचे फोटो आणि एक्स रे रिपोर्ट व्हॉट्सअप केले, तिलाही स्वामी चैतन्यानंद तू खूप सुंदर आहे असे मेसेज पाठवू लागला.
इतकेच नाही तर एफआयआरमध्ये एका घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात होळीच्या दिवशी स्वामी चैतन्यानंद विद्यार्थिनींना रांगेत उभे करायचा, त्यांना हरी ओम बोलायला लावून समोर वाकवायचा. त्यानंतर विद्यार्थिनीच्या कपाळावर, गालावर रंग लावायचा. त्यात एका विद्यार्थिनीला त्याने बळजबरीने स्पर्श केले. वारंवार तिला बेबी म्हणून बोलवत होता असं तक्रारीत म्हटलं आहे. संस्थेत आणि हॉस्टेलमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून तो मुलींच्या हालचालींवर लक्ष ठेवायचा. हॉस्टेलच्या लॉबीपासून ते बाथरूमच्या बाहेरपर्यंत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तो त्याच्या मोबाईलवर पाहत होता. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या ७५ विद्यार्थिनी या हॉस्टेलमध्ये राहायच्या. स्वामी चैतन्यानंद त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे याची कल्पनाही त्यांना नव्हती.
दरम्यान, तपासात चैतन्यानंदने धार्मिक ट्रस्टची संपत्ती खासगी वापरासाठी भाड्याने देत मोठी कमाई केली, त्या पैशातून लग्झरी कार खरेदी केल्या. त्याच्याकडे वॉल्वो, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्या आहेत. मुलींसोबत लैंगिक शोषणचा प्रकार समोर येताच स्वामी चैतन्यानंद याने डीवीआरमध्ये छेडछाड करत सीसीटीव्ही फुटेज मिटवण्याचे प्रयत्न केले. या आरोपाची माहिती मिळताच संस्थेने ४ पानी निवेदन जारी केले. ज्यात विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.