मर्डर मिस्ट्री! हनिमूनच्या रात्रीचं गूढ... वधूकडे नव्हता मोबाईल; पोलिसांना भलताच संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:34 IST2025-03-11T10:33:58+5:302025-03-11T10:34:48+5:30
शिवानीचं कुटुंब दिल्लीत राहत होतं आणि गेल्या एक वर्षापासून या लग्नाची चर्चा होती.

मर्डर मिस्ट्री! हनिमूनच्या रात्रीचं गूढ... वधूकडे नव्हता मोबाईल; पोलिसांना भलताच संशय
अयोध्येत हनिमूनच्या रात्री वधू आणि वर दोघांच्याही मृत्यूचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक गोष्टीही समोर आल्या आहेत. वधू शिवानीचा गळा दाबल्याने मृत्यू झाला तर वर प्रदीपचा गळफास घेतल्याने मृत्यू झाला. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात एक गोष्ट समोर येत आहे की, रात्री प्रदीपच्या मोबाईलवर काही मेसेज किंवा फोटो आले असावेत ज्यामुळे दोघांमध्ये बिनसलं.
कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, खोलीचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे बाहेरील व्यक्ती आत जाण्याची शक्यता नव्हती. म्हणूनच पोलीस सध्या असा अंदाज लावत आहेत की, प्रदीपने आधी शिवानीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. एसएसपी राज करण नय्यर हे शिवानी आणि प्रदीपच्या पालकांशी स्वतंत्रपणे बोलून हे प्रकरणाचा तपास करत आहेत.
शिवानीकडे नव्हता मोबाईल
शिवानीचं कुटुंब दिल्लीत राहत होतं आणि गेल्या एक वर्षापासून या लग्नाची चर्चा होती. मुलीच्या कुटुंबाने एप्रिलमध्ये लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु प्रदीपच्या कुटुंबाने मार्चमध्येच लग्न करण्याचा आग्रह धरला, ज्यावर सहमती झाली. लग्नापूर्वी शिवानी आणि प्रदीप एकमेकांशी बोलत होते, असं सांगितलं जात आहे, परंतु एक आश्चर्यकारक गोष्ट अशीही समोर आली आहे की शिवानीकडे मोबाईल नव्हता. मोबाईल का नव्हता असा प्रश्न आता अनेकांच्या मनात आहे.
मृत्यूपूर्वी काय घडलं?
पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात एक अँगल समोर येत आहे की, रात्री मोबाईलवर काही मेसेज किंवा फोटो आले असावेत, त्यानंतर दोघांमध्ये बिनसलं असावं. एखाद्या गोष्टीचा राग आल्यानंतर प्रदीपने शिवानीचं तोंड दाबलं असावं आणि तिचा गुदमरून मृत्यू झाला. जेव्हा हे प्रदीपला कळलं तेव्हा घाबरून त्याने कदाचित आपला जीव देण्याचा निर्णय घेतला असेल. हा फक्त एक अँगल आहे, अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.
या संपूर्ण घटनेत कुटुंबातील सदस्य उघडपणे काहीही बोलण्याचं टाळत आहेत. विशेषतः शिवानीकडे मोबाईल नसल्याचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. त्याच वेळी, पोलिसांनाही कोणताही ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.