बंद खोलीत ३ तास, 'तो' कॉल... मोबाईल हिस्ट्रीमधून उलगडणार गूढ, शेवटी कोणाशी झालं बोलणं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:04 IST2025-03-11T12:04:25+5:302025-03-11T12:04:25+5:30
हनिमूनच्या रात्री झालेल्या शिवानी आणि प्रदीपच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

फोटो - आजतक
अयोध्येत हनिमूनच्या रात्री झालेल्या शिवानी आणि प्रदीपच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. एकीकडे, शवविच्छेदन अहवाल आणि मोबाईल कॉल डिटेल्सवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे, कुटुंब काहीही बोलण्यास तयार नसल्याने हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालं आहे. रात्री १२ वाजता झोपायला जाणाऱ्या या नवविवाहित जोडप्याने आयुष्य अवघ्या तीन तासांत का संपवलं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात पोलीस व्यस्त आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदीपने सर्वात शेवटी त्याच्या एका नातेवाईकाला फोन केला. कोणतीही विशिष्ट चर्चा झाली नाही. पोलिसांनी नातेवाईकाची चौकशी केली तेव्हा प्रदीपने नवीन मोबाईल फोन खरेदी करण्याबद्दल सांगितल्याचं उघड झालं. तसेच पोलिसांना प्रदीपच्या फोनवर एक अपूर्ण टाइप केलेला मेसेजही सापडला, ज्यामध्ये शिवानीचं नाव लिहिलेलं होतं. प्रदीपला कोणाला काही सांगायचं होतं का? की हा फक्त योगायोग होता? याबद्दल कोणालाही काहीही माहिती नाही.
पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, रात्री ३ वाजता शिवानीचा गळा दाबल्याने मृत्यू झाला. म्हणजेच रात्री १२ वाजता झोपायला गेलेल्या जोडप्यामध्ये तीन तासांच्या आत काहीतरी घडलं ज्यामुळे त्यांचा जीव गेला. शिवानीचा गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर प्रदीपने आत्महत्या केली. सध्या पोलीस याचा तपास करत आहेत. पण ही खरोखरच आत्महत्या होती का की या संपूर्ण घटनेत तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग होता, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे तिथे तिसरा कोणी असण्याची शक्यता नाही. एसएसपी म्हणाले की, जेव्हा पोलीस आले तेव्हा दरवाजा आधीच तोडला गेला होता कारण सकाळी दरवाजा न उघडल्यावर कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडला. आतील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला आणि त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं.
प्रदीप आणि शिवानी यांचं ७ मार्च रोजी लग्न झालं. रविवारी रिसेप्शन होतं. प्रदीपच्या मोठ्या भावाने सांगितलं की, रविवारी रिसेप्शन होतं. ज्यासाठी घरामध्ये जोरदार तयारी सुरू होती. मी कुटुंबातील काही सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत भाज्या खरेदी करण्यासाठी गेलो होतो. मी भाज्या खरेदी करत असताना मला घरून फोन आला. कुटुंबातील सदस्यांनी लवकर घरी येण्यास सांगितलं. त्यानंतर आम्ही भाज्या तिथेच सोडून घराकडे धावलो. मी घरी पोहोचलो तेव्हा कुटुंबातील सर्वजण रडत होते.