ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:03 IST2025-12-08T18:02:12+5:302025-12-08T18:03:39+5:30
Australia Toyah Cordingley murder case: सात वर्षांपूर्वी घडला होता प्रकार, आज सुनावली शिक्षा

ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
Australia Toyah Cordingley murder case: ऑस्ट्रेलियात सात वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येप्रकरणी एका भारतीय व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियातील वांगेट्टी बीचवर २४ वर्षीय टोया कॉर्डिंग्लेचा मृतदेह वाळूत अर्धा गाडलेला आढळून आला होता. उत्तर क्वीन्सलँडमधील हा समुद्रकिनारा केर्न्स आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या पोर्ट डग्लस यांच्यामध्ये आहे. कॉर्डिंग्लेवर २६ वेळा चाकूने वार करण्यात आले होते आणि तिचा गळाही चिरण्यात आला होता. ४१ वर्षीय राजविंदर सिंग घटनास्थळावरून पळून गेला आणि तो चार वर्षे भारतात लपला होता. २०२२ मध्ये त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला. महिनाभर चाललेल्या खटल्यानंतर त्याला दोषी ठरवण्यात आले. राजविंदरविरुद्धचा हा दुसरा खटला होता. याआधी मार्चमध्ये खटला चालवण्यात आला होता, पण त्यात ज्युरी निकालापर्यंत पोहोचू शकले नव्हते.
कॉर्डिंग्लेच्या हत्येनंतरचा गोंधळ
कॉर्डिंग्ले ही मेडिकल सेवा देणाऱ्या दुकानातील कर्मचारी आणि प्राणी निवारा स्वयंसेवक होती. तिच्या कामामुळे स्थानिक पातळीवर तिला मोठा प्रतिसाद मिळात होता. तिच्या हत्येमुळे क्वीन्सलँडमध्ये शोककळा पसरली होती. केर्न्स सर्वोच्च न्यायालयाने असे ऐकले की कॉर्डिंग्लेवर वारंवार धारदार वस्तूने वार करण्यात आले आणि नंतर वाळूमध्ये तिला पुरण्यात आले, ज्यामुळे ती जगू शकली नाही.
तपास सुरु होण्याआधीच राजविंदर फरार
मूळचा पंजाबचा रहिवासी असलेला राजविंदर हत्येच्या वेळी इनिसफेल येथे राहत होता. हे शहर गुन्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे दोन तास दूर आहे. पोलिसांनी ताबडतोब त्याला संशयित म्हणून ओळखले आणि तपास सुरू केला, परंतु तो आधीच देश सोडून पळून गेला होता. त्याची पत्नी, तीन मुले आणि पालक मागे सोडून. चार वर्षांनंतर त्याला दिल्लीत अटक करण्यात आली आणि २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाला प्रत्यार्पण करण्यात आले.
न्यायालयात पुरावे सादर
घटनास्थळावरून फोन रेकॉर्ड, डीएनए नमुने, सीसीटीव्ही आणि ट्रॅफिक कॅमेरा फुटेजदेखील जप्त करण्यात आले. यावरून रविंदरच्या कारची हालचाल दिसून आली. पुराव्यांमध्ये एका काठीवर सापडलेला डीएनए देखील समाविष्ट होता, जो राजविंदरचा होता. तपासात असेही दिसून आले की हल्ल्यानंतर कॉर्डिंग्लेचा फोन आणि राजविंदरच्या कारचे लोकेशन एकमेकांशी मिळतेजुळते आहे. म्हणजेच कॉर्डिंग्लेचा फोन कारमध्ये होता. राजविंदरला मंगळवारी त्याच्या शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.