लग्नापासून वाचण्यासाठी 'इच्छाधारी नागीण'चा हायव्होल्टेज ड्रामा; कात ठेवून 'ती' बॉयफ्रेंडसह पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:03 IST2026-02-11T14:02:39+5:302026-02-11T14:03:19+5:30
लग्नापासून सुटका करून घेण्यासाठी एका तरुणीने असा काही फिल्मी ड्रामा रचला की, संपूर्ण गाव सुरुवातीला प्रचंड घाबरलं.

लग्नापासून वाचण्यासाठी 'इच्छाधारी नागीण'चा हायव्होल्टेज ड्रामा; कात ठेवून 'ती' बॉयफ्रेंडसह पसार
लग्नापासून सुटका करून घेण्यासाठी एका तरुणीने असा काही फिल्मी ड्रामा रचला की, संपूर्ण गाव सुरुवातीला प्रचंड घाबरलं. २५ वर्षीय रीनाचं लग्न तिच्या कुटुंबीयांनी ठरवलं होतं. मात्र तिला हे नातं मान्य नव्हतं. अशा परिस्थितीत घरून पळून जाण्यापूर्वी रीनाने असा काही प्लॅन केला, ज्याबद्दल समजल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
औरैया जिल्ह्यातील फफूंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. रीनाचं लग्न तिच्या संमतीशिवाय ठरवण्यात आलं होतं. रीना या लग्नामुळे आनंदी नव्हती. लग्नापासून वाचण्यासाठी तिने अत्यंत फिल्मी गोष्ट रचली. रीना रात्रीच्या वेळीच घरातून बाहेर पडली, पण जाण्यापूर्वी तिने आपल्या खोलीत बेडवर ५ फूट लांबीच्या सापाची कात आणि काही बांगड्या ठेवल्या. जेणेकरून सर्वांना वाटावं की ती 'नागीण' बनली आहे.
'इच्छाधारी नागीण'
सकाळी जेव्हा ती बराच वेळ खोलीबाहेर आली नाही, तेव्हा कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी खोलीत जाऊन पाहिलं असता तिथे सापाची कात दिसली, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी विविध चर्चा सुरू केल्या. कोणी म्हटलं की मुलगी नागीण झाली आहे, तर कोणी याला चमत्कार मानू लागलं. पाहता पाहता रीनाच्या घराबाहेर गर्दी जमली. आसपासचे लोकही हे दृश्य पाहण्यासाठी पोहोचू लागले. ती मुलगी 'इच्छाधारी नागीण' होती आणि कात सोडून निघून गेली आहे असा लोकांचा समज झाला.
पोलीस तपासात समोर आलं सत्य
काही तासांतच ही बातमी वणव्यासारखी पसरली आणि लोक घाबरले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एका गावकऱ्याने स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तपासादरम्यान समोर आलं की, रीनाचे आधीच प्रेमसंबंध सुरू होते, तर तिचे घरचे लोक तिचं लग्न दुसरीकडे लावून देऊ इच्छित होते. यापासून वाचण्यासाठी तिने 'नागीण' बनण्याचं नाटक रचलं आणि संधी मिळताच रात्रीच्या अंधारात प्रियकरासोबत पळ काढला. पोलीस सध्या या तरुणीचा शोध घेत आहेत, मात्र अद्याप तिचा पत्ता लागलेला नाही. गावकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून तिने हा सर्व प्लॅन रचला होता.