धारदार हत्यार डोक्यात मारून खुनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 19:57 IST2019-10-19T19:54:10+5:302019-10-19T19:57:06+5:30
सिंहगड रस्त्यावरील घटना; जखमी तरुण अनोळखी

धारदार हत्यार डोक्यात मारून खुनाचा प्रयत्न
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगांव पुलाखाली एका अनोळखी इसमाचा अज्ञात कारणांवरून कोणत्यातरी धारदार हत्याराने त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले असून, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे हवालदार रुस्तुम शेख यांनी याबाबत फिर्याद दिली असून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजनेच्या सुमारास काही तरुणांना वडगांव पुलाखाली असणाऱ्या दत्तवाडी वाहतूक विभागाच्या कार्यालयामागे पुलाच्या खांबाशेजारी एक अनोळखी इसम गंभीर जखमी अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी तत्काळ सिंहगड रस्ता पोलिसांशी संपर्क साधला असता, पोलीस तात्काळ घटनास्थळी आल्यानंतर त्या गंभीर जखमी अवस्थेत असणाऱ्या अज्ञाताला ताबडतोब ससूनमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. त्या अज्ञात व्यक्तीचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने त्यास जीवे मारण्याचा उद्देशाने त्याचे डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी केले असून त्याच्यावर ससूनमध्ये उपचार सुरु असून सध्या त्याला बोलता येत नसल्याने त्याचा नाव, पत्ता समजू शकला नसला तरी आम्ही त्या घटनेचा गांभीर्याने तपास करीत असल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले. सदर घटनेचे वृत्त समजताच सहायक पोलीस आयुक्त पी. डि . राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ननावरे करीत आहेत.