पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 18:13 IST2022-02-13T18:12:33+5:302022-02-13T18:13:21+5:30
Suicide Attempt : सोमनाथवर मारामारी आणि पिस्तूल बाळगल्याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
डोंबिवली: पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन भररस्त्यात तिच्यावर चाकूने वार करून पसार झालेला आरोपी पती सोमनाथ देवकर (वय 45) याने राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी दत्तनगर येथे घडली. यात सोमनाथ गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंबिवली पुर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ राहणा-या सोमनाथने 8 फेब्रुवारीला चारित्र्याच्या संशयातून पत्नी वंदनावर भररस्त्यात चाकूने वार केले होते. यात वंदना गंभीर जखमी झाली. तर सोमनाथने घटनेनंतर पोबारा केला होता. रामनगर पोलीस ठाण्यात सोमनाथ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान सोमनाथ रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आला. घराबाहेर लावलेले कुलूप तोडून तो घरात शिरला व त्याच्याजवळील पिस्तूलाने स्वत:च्या छातीवर गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात सोमनाथ गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत त्याला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
स्वतःवर झाडली गोळी! पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न pic.twitter.com/4UC1BlvCh5
— Lokmat (@lokmat) February 13, 2022
सोमनाथवर याआधीही पिस्तूल बाळगल्याचा गुन्हा
सोमनाथवर मारामारी आणि पिस्तूल बाळगल्याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पत्नीवर वार करून तो नाशिक येथील जंगलात लपला होता त्यानंतर आज तो सकाळी घरी कोणीही नसताना येऊन त्याच्या जवळील बेकायदेशीर पिस्तूलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने ही पिस्तूल मध्यप्रदेश येथून आणली असल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याने ही पिस्तुल कोणाकडून आणि कशासाठी आणली याचा तपास सुरू असल्याची माहीती रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिली. सोमनाथ हा मच्छी, भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा तसेच खानावळीची देखील कामे करायचा अशी माहीतीही त्यांनी दिली.
स्वतःवर झाडली गोळी! पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न pic.twitter.com/uBEo9ZNvTJ
— Lokmat (@lokmat) February 13, 2022