भिवंडीत दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न, घराला लावली आग; आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:27 IST2024-12-29T10:26:57+5:302024-12-29T10:27:51+5:30
सुदैवाने नागरिकांनी तत्काळ आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती मिळत आहे.

भिवंडीत दाम्पत्याला जाळण्याचा प्रयत्न, घराला लावली आग; आरोपी फरार
भिवंडी : शहरातील निजामपूर पोलिस ठाण्याच्या कुरेशीनगर परिसरातील एका घरात पतिपत्नी झोपलेले असताना, घराला आग लावून त्यांना जळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. यात पतिपत्नी भाजल्याने जखमी झाले आहेत. आग भडकल्यावर सिलिंडरनेही पेट घेतला. सुदैवाने नागरिकांनी तत्काळ आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती मिळत आहे.
फरिन आसिफ कुरेशी व पती आसिफ कुरेशी असे दोघा जखमींची नावे आहेत. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावून आरोपी फरार झाले. यावेळी हल्लेखोराने घराच्या मागील दरवाजाची बाहेरून कडी लावली होती. आगीने पेट घेत घरात धूर जमा झाल्याने दोघे जागे झाले. त्यांनी दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता, तो दरवाजा बाहेरून बंद होता. दोघांनी आरडाओरड केल्याने शेजारी जागे होऊन घटनास्थळी धाव घेत आग विझविली. दरम्यान, पतिपत्नी हे आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना भाजल्याने जखमी झाले आहेत.
स्थानिकांनी या दोघांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. स्थानिक निजामपूर पोलिस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.
जीवे मारण्याची धमकी
परिसरात मादक पदार्थ विक्री करून गुंडगिरी करणारे तौकिर आणि त्याच्या साथीदारांनी ही आग लावल्याचा आरोप जखमी आसिफ यांनी केला आहे. तीन महिन्यांपूर्वी तौकिर आणि त्याच्या साथीदारांनी आसिफ याचा मेव्हणा अनस व त्याच्या कुटुंबीयांना क्षुल्लक वादातून मारहाण केली होती.
या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घे, नाहीतर तुमचे कुटुंब संपवून टाकू, अशी धमकी आरोपींनी दिली होती. त्या रागातून हे कृत्य केल्याचे सांगत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जखमी आसिफ याने केली.