अंगावर फटाका फेकल्याच्या रागात हत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 14:57 IST2019-10-31T14:54:42+5:302019-10-31T14:57:53+5:30
दिंडोशी पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अंगावर फटाका फेकल्याच्या रागात हत्येचा प्रयत्न
मुंबई - मौजमजेत मित्राच्या अंगावर फटाका फेकल्याच्या रागात अल्पवयीन तरुणाने १६ वर्षीय सुहास कोकाटेवर प्राणघातक हल्ला चढविला. यात, कोकाटे गंभीर जखमी असून, दिंडोशी पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कोकाटे हा गोरेगाव पूर्वेकडील शिवाजीनगरमध्ये राहतो. मंगळवारी रात्री उशिरा तो घराबाहेर मित्रासोबत फटाके फोडत होता. त्याच दरम्यान त्याने तो फटाका मित्राच्या अंगावर टाकला. याच रागात मित्राने त्याला मारहाण सुरू केली. त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. कोकाटेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी कोकाटेच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत, त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.