एटीएस करणार संशयिताच्या व्हॉट्स अॅप आणि स्नॅपचॅटचा तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 19:11 IST2019-01-24T19:10:35+5:302019-01-24T19:11:51+5:30
ताब्यात असलेल्या ९ जणांचा जास्तीत जास्त संपर्क हा व्हॉट्स अॅप आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून असल्याने त्याचा तपास एटीएस करणार आहे.

एटीएस करणार संशयिताच्या व्हॉट्स अॅप आणि स्नॅपचॅटचा तपास
मुंबई - दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या ९ संशयित अतिरेक्यांनी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रेरित होऊन उम्मत-ए-मोहम्मदिया नावाचा गट तयार केला होता. उत्तर प्रदेशातील कुंभ मेळ्यासह अनेक संवेदनशील ठिकाणी रासायनिक हल्ला करण्याचा कट त्यांनी आखल्याची माहिती एटीएसच्या चौकशीत समोर आली आहे. ताब्यात असलेल्या ९ जणांचा जास्तीत जास्त संपर्क हा व्हॉट्स अॅप आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून असल्याने त्याचा तपास एटीएस करणार आहे.
संशयित अतिरेक्यांपैकी एक जण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक राशीद मलबारी याचा मुलगा आहे. मजहर अब्दुल रशिद शेख (२१), मो. तकी उर्फ अबु खालीद सिराजउद्दीन खान (२०), मो. मुशाहिद उल इस्लाम (२३), मो. सर्फराज उर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२०) जमान नवाब कुटेपड (३२),सलमान सिराजउद्दीन (२८), फहाज सिराजउद्दीन (२८) मोहसीन सिराजोद्दीन (३२) अशी त्यांची नावे असून त्यातील काही जण फार्मासिस्ट तर काही इंजिनिअर आहेत. तसेच एक अल्पवयीन संशयितास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही जण फार्मासिस्ट तर काही इंजिनिअर, सायबर सायन्स शिकलेले आहेत. अनेकजण उच्चशिक्षित असल्याने तंत्रज्ञानाची बरीच माहिती यांना होती. पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून बहुतांश वेळा हे ९ जण व्हॉट्स अॅप आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून संपर्कात असत. अनेकांनी त्यांचे व्हॉट्स अॅप आणि स्नॅपचॅटचे संभाषण डिलिट केल्याचे देखील निष्पन्न झाले असून तो डेटा मिळविण्याचा एटीएसचा प्रयत्न आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे एटीएस यंत्रणा हा डेटा मिळविण्यासाठी उच्च पातळीवर प्रयत्न करत आहे.