मंदिर बांधण्याच्या वादातून वडाळयात वृद्ध वडिलांसह मुलावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 20:19 IST2021-07-06T20:18:40+5:302021-07-06T20:19:11+5:30
Crime News : याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे.

मंदिर बांधण्याच्या वादातून वडाळयात वृद्ध वडिलांसह मुलावर प्राणघातक हल्ला
मुंबई : वडाळयात मंदिर बांधण्याच्या वादातून वृद्ध वडिलांसह त्यांंच्या मुलावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे.
             
या हल्ल्यात दुराई तेवर (६१) आणि रमेश तेवर (३२) जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सायन कोळीवाडा येथील म्हाडा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहण्यास आहेत. याच परिसरात मंदिर उभारण्याच्या वादातून गेल्या सहा महिन्यापासून आरोपी आणि त्यांच्यात वाद सुरु होते. याच वादातून सोमवारी रात्री ९ वाजता आरोपीनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
 
घटनेची वर्दी लागताच वडाळा टी टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. यात मेरी तेवर, अरुमुगम तेवर, मुरुगेन तेवर आणि आर्ले तेवर या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.