शेजारी हा आपला पहिला नातेवाईक असतो,असं म्हणतात. मात्र, मुंबईत दोन शेजाऱ्यांमधील वाद इतका टोकाला गेला की हाणामारीत त्यांनी एकमेकांचा जीव घेतला. मुंबईतील गणपत पाटील नगरमध्ये रविवारी संध्याकाळी दोन कुटुंबांमध्ये झालेला वाद इतका विकोपाला गेला की, त्यात ३ जणांचा मृत्यू आणि ४ जण जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, गणपत पाटील नगर येथील झोपडपट्टीत राहणारे शेख आणि गुप्ता कुटुंब २०२२ पासून एकमेकांचे शत्रू होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले होते.
जुन्या शत्रुत्वाला लागले हिंसक वळणसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ४.३० च्या सुमारास, हमीद नसिरुद्दीन शेख दारूच्या नशेत राम नवल गुप्ता यांच्या नारळाच्या दुकानाजवळून चालत जात होते आणि या दरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, दोन्ही कुटुंबांनी आपापल्या मुलांना देखील बोलावून घेतले.
एकमेकांवर केले वार
राम नवल गुप्ता, त्यांचे पुत्र अमर गुप्ता, अरविंद गुप्ता आणि अमित गुप्ता हे घरून धारदार शस्त्रे घेऊन आले आणि हमीद नसिरुद्दीन शेख आणि त्यांचे पुत्र अरमान हमीद शेख आणि हसन हमीद शेख यांच्याशी हाणामारी करण्यास सुरुवात केली. या वादावादीत राम नवल गुप्ता आणि अरविंद गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला, तर अमर गुप्ता आणि अमित गुप्ता गंभीर जखमी झाले. शेख कुटुंबातील हमीद नसिरुद्दीन शेख यांचाही मृत्यू झाला, त्यांचे मुलगे अरमान आणि हसन शेख जखमी झाले आहेत. या घटनेतील सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला असून. एका आरोपीला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.