तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 09:33 IST2021-08-05T09:32:06+5:302021-08-05T09:33:04+5:30
Praveen Jadhav: ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी स्पर्धेत निवड झालेल्या प्रवीण जाधव या खेळाडूने त्याच्या कुटुंबीयांना काहीजण त्रास देत असून, त्यांनी धमकीही दिल्याचे सांगितल्याने शासकीय यंत्रणा या प्रकरणाचा मागोवा घेत आहेत.

तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना धमकी
फलटण (जि. सातारा) : ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी स्पर्धेत निवड झालेल्या प्रवीण जाधव या खेळाडूने त्याच्या कुटुंबीयांना काहीजण त्रास देत असून,
त्यांनी धमकीही दिल्याचे सांगितल्याने शासकीय यंत्रणा या प्रकरणाचा मागोवा घेत आहेत. या तक्रारीची अद्याप पोलिसात नोंद झालेली नाही.
हरियाणा येथे सराव करत असलेल्या प्रवीण जाधव याने तेथे पत्रकारांना सांगितले की, सरडे (ता. फलटण) गावातील एका कुटुंबातील पाच ते सहा लोक माझ्या घरी आले आणि त्यांनी माझे आई-वडील व काका-काकूंना धमकावण्यास सुरुवात केली. जाधव यांच्या कुटुंबातील चार सदस्य झोपडीत राहत होते. मात्र, प्रवीण सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले आहे. माझ्या शेजाऱ्यांना घरासमोरून एक वेगळा रस्ता हवाय. त्यावर आम्ही त्यांना होकारही दिला होता. मात्र, आता त्यांनी हद्द केलीय. त्यांनी माझ्या कुटुंबीयांना धमकी देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही घराची दुरुस्ती करणार
असल्याने त्यांनी आम्हाला विरोध दर्शविला आहे, असेही त्याने सांगितले आहे.
या तक्रारीची अद्याप पोलिसात नोंद झाली नसली, तरी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सरडे येथे जाऊन या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कुटुंबीयांनी सातारा जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते.