Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 15:00 IST2021-06-17T14:06:19+5:302021-06-17T15:00:27+5:30
Antilia Bomb Scare: विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.

Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकले. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्माएनआयएच्या रडारवर होते. लोणावळ्यातील रिसॉर्टमधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. थोडयाच वेळात त्यांना सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर केले जाईल.
संतोष शेलार, आनंद जाधव यांनी चौकशीदरम्यान प्रदीप शर्मा यांचे नाव घेतले होते. आज सकाळी सहाच्या सुमारास कोणालाही सुगावा लागू न देता एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. शिवाय केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलांनाही तैनात करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता एनआयएची टीम जेबीनगरमध्ये दाखल होती. एनआयएची टीम, सीआरपीएफ १० ते १२ गाडया घटनास्थळी आहेत. याप्रकरणी प्रदीप शर्मा यांची भगवान भवन या अंधेरीतील इमारतीत ही चौकशी सुरु होती. अंधेरीतील हा उच्चभ्रू परिसर आहे.
अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप pic.twitter.com/Mvi34CuFEy
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2021
दरम्यान, याआधी या प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. परंतु आता थेट छापा टाकून एनआयएनने झाडाझडती सुरु केली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरण हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तसेच, याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे मित्र आहेत. याचबरोबर, या प्रकरणात नुकतीच एनआयएने संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा प्रदीप शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचे बोलले जाते, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही एनआयएने चौकशीला बोलावले होते.
प्रदीप शर्मा यांची कारकीर्द
१९८३ साली पोलीस सेवेत रूजू झालेले प्रदीप शर्मा हे घाटकोपर आणि माहीम ही दोन पोलीस ठाणी वगळता बहुतांश काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. पोलिस दलात सर्वाधिक एन्काऊंटर करण्याची कामगिरी शर्मा यांच्याच नावावर आहे. त्यात मुंबई बॉम्बस्फोटातील 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा समावेश आहे. त्यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता.