न्यायालयातून पलायनानंतर आणखी एका चिमुरडीची अत्याचार करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:42 IST2025-10-04T10:41:02+5:302025-10-04T10:42:23+5:30
गुन्हा करून दोन महिने भिवंडीमध्ये वास्तव्य

न्यायालयातून पलायनानंतर आणखी एका चिमुरडीची अत्याचार करून हत्या
भिवंडी : ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्याच्या गुन्ह्यात आरोपीस भिवंडी न्यायालयात आणले असता ताे पोलिसांना चकमा देऊन पसार झाला. त्यानंतर त्याने ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. सलामत अन्सारी (३४) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी दोन महिने शहरात होता; त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे.
१ ऑक्टोबर रोजी ७ वर्षीय चिमुरडी सार्वजनिक स्वच्छतागृहात गेली होती. बराच वेळ ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता एका बंद खोलीत चिमुरडीने स्वच्छतागृहात जाताना सोबत नेलेली बादली आढळली. नागरिकांनी खोलीचे कुलूप तोडून प्रवेश केला तर तेथे एका कोपऱ्यात प्लास्टिक गोणीत तिचा मृतदेह तोंडात कुरकुरे कोंबलेल्या अवस्थेत आढळला.
सात दिवसांची पाेलिस काेठडी
आरोपी सलामत हा काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथील एका खोलीत आठवड्यापूर्वी भाड्याने राहण्यासाठी आला होता. घटनेनंतर भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीतील दिवाण शहा तलाव येथे फिरत हाेता.
भोईवाडा पोलिसांना आराेपीची माहिती समजताच त्याला सापळा लावून अटक केली. त्याचा ताबा निजामपूर पोलिसांकडे सोपवला. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.
नराधमाची हत्या करा
माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याचीही तशीच हत्या करा तेव्हाच माझ्या मुलीच्या आत्म्याला व आम्हाला शांती मिळेल, अशी मागणी करत पीडितेच्या आईने टाहो फोडला. मालकाने चाळीत राहायला आलेल्या भाडेकरूची माहिती पोलिसांना देणे गरजेचे असतानाही पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे चाळ मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती भिवंडीचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.
पोलिसांचे अपयश चव्हाट्यावर
आरोपी सलामत हा विकृत असून, त्याने १३ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील फेणेगाव येथे चाळीतील सहावर्षीय चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवत खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार करून हत्या केली होती. मुलीचा मृतदेह गोणीत कोंबून तो पसार झाला होता. पोलिसांनी सलामतला बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील नवादा या गावातून अटक केली. न्यायालयीन सुनावणीसाठी त्यास ४ ऑगस्ट रोजी ठाणे कारागृहातून भिवंडी न्यायालयात आणले असता पोलिसांची नजर चुकवून तो पसार झाला होता.