आठवड्याभरात दुसरी घटना; पुन्हा कोपर- डोंबिवलीदरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 16:09 IST2019-07-25T16:07:58+5:302019-07-25T16:09:20+5:30
रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची ही आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे.

आठवड्याभरात दुसरी घटना; पुन्हा कोपर- डोंबिवलीदरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
ठाणे - गर्दीनं गच्च भरलेल्या मुंबईच्या रेल्वे अपघाताने आणखी एकाचा आज बळी घेतला आहे. कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान शिव वल्लभ गुजर (२६) या तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. आज सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची ही आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे.
२२ जुलैला डोंबिवलीची रहिवासी असलेल्या ३० वर्षीय सविता नावाच्या एका तरुणीचा गर्दीमुळे कोपर ते दिवा या रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून खाली पडून मृत्यू झाला होता. शिव वल्लभ कुमार हा २६ वर्षांचा तरुण डोंबिवलीत राहत होता. मशीद बंदर येथील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे आज तो कामावर निघाला होता. कर्जतकडून येणारी आणि सीएसएमटीकडे जाणारी ८ वाजून ५० मिनिटांची जलद लोकल त्यानं पकडली. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. डोंबिवली - कोपरदरम्यान त्याचा तोल गेला आणि तो लोकलमधून खाली पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. डाऊन दिशेकडून येणाऱ्या लोकलच्या मोटरमननं या घटनेची माहिती डोंबिवली रेल्वे स्थानकात दिली. त्यानंतर काही वेळाने रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शास्त्री नगर रुग्णालयात दाखल केले.