संतापलेला पती बनला काळ! पत्नीने डान्स केल्याचा राग अनावर, वरवंट्याने डोकं ठेचून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:54 IST2026-01-22T15:53:19+5:302026-01-22T15:54:01+5:30
पत्नीने एका शोभायात्रेत डान्स केल्याचा राग मनात धरून पतीने तिची निर्घृण हत्या केली आहे.

AI Generated Image
रागाच्या भरात माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय बिहारची राजधानी पाटणा येथे आला आहे. पत्नीने एका शोभायात्रेत डान्स केल्याचा राग मनात धरून पतीने तिची निर्घृण हत्या केली आहे. शास्त्री नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मछली गली या भागामध्ये ही खळबळजनक घटना घडली. विजेंद्र कुमार नावाच्या नराधमाने आपल्या पत्नीच्या, प्रीतीच्या डोक्यावर वरवंट्याने एकामागून एक ४-५ वार केले, ज्यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विवाद आणि डान्सचे निमित्त
समोर आलेल्या माहितीनुसार, मृत प्रीती कुमारी काही दिवसांपूर्वी राजा बाजार परिसरात एका 'साई शोभायात्रे'मध्ये सहभागी झाली होती. या यात्रेत तिने डान्स केला होता. प्रीती डान्स करत असल्याचे पाहून तिचा पती विजेंद्र प्रचंड संतापला होता. ती घरी परतल्यानंतर यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. मंगळवारी रात्री या वादाने टोक गाठले आणि रागाच्या भरात विजेंद्रने घरातील पाटा-वरवंट्यातील वरवंटा उचलून थेट पत्नीच्या डोक्यावर प्रहार केले.
उपचारादरम्यान मृत्यू, आरोपी पती फरार
या हल्ल्यानंतर प्रीती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिला गंभीर जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी विजेंद्र घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.
हुंड्यासाठी छळाचाही आरोप
विजेंद्र आणि प्रीती यांचे लग्न अवघ्या दोन वर्षांपूर्वी, २०२४ मध्ये झाले होते. केवळ डान्सचे कारण नसून, विजेंद्र तिला हुंड्यासाठी सतत त्रास देत होता, असा आरोप प्रीतीच्या वडिलांनी केला आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुंडाबळी आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेबाबत माहिती देताना एसडीपीओ साकेत कुमार यांनी सांगितले की, "शास्त्री नगर परिसरात पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यावर समजले की पतीने पत्नीवर जड वस्तूने हल्ला केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून एफएसएल टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले जात आहेत. आरोपीला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे."