पतीचे अनैतिक संबंध असल्याने महिलेला झाडाला बांधून मारलं; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 22:26 IST2025-07-16T22:24:28+5:302025-07-16T22:26:32+5:30
आंध्र प्रदेशात एका महिलेला अनैतिक संबंधाच्या आरोपांखाली झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.

पतीचे अनैतिक संबंध असल्याने महिलेला झाडाला बांधून मारलं; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रकार
Andhra Pradesh Crime:आंध्र प्रदेशातून हादरवारी घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पलाकोडेरू मंडळातील मोगल्लू गावात हा धक्कादायक प्रकार घडला. एका महिलेला अवैध संबंध असल्याच्या आरोपाखाली खांबाला बांधून सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही पतीने कर्ज न फेडल्याने एका महिलेला मारहाण करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका सीफूड कंपनीत काम करते आणि अविवाहित आहे. याच कंपनीत ती डोंगा सुब्बाराव नावाच्या पुरुषासोबत काम करायची. सुब्बारावच्या पत्नी आणि तिच्या कुटुंबाला दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयावरूनच महिलेला मारहाण करण्यात आली. बुधवारी, सुब्बारावची पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडितेला जबरदस्तीने घराबाहेर खेचून काढले. त्यानंतर त्यांनी तिला गावातील एका खांबाला बांधले आणि जबर मारहाण केली. ती महिला मदतीसाठी ओरडत राहिली, पण लोक फक्त बघत राहिले. कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस अधिकारी पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेची सुटका केली आणि तिला भीमावरम येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात सहभागी असलेल्या महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, महिन्याभरापूर्वी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील नारायणपुरम गावात कर्ज फेडू न शकल्याने एका महिलेला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच जणांना अटक केली. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुलीचे शाळेतील प्रमाणपत्र घेण्यासाठी ही महिला गावात आली होती. त्याचवेळी आरोपींनी तिला ओढत आणलं एका झाडाला बांधले. ८० हजार रुपयांच्या कर्जासाठी ही मारहाण करण्यात आली होती.