'नको त्या' अवस्थेत पाहिले अन्...; काँग्रेस शहराध्यक्षाच्या पुतण्याची हत्या; पती-पत्नीने विहिरीत फेकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 17:24 IST2025-12-27T17:17:05+5:302025-12-27T17:24:28+5:30
अमरावतीत भाजी विक्रेत्याच्या खुनाचा धक्कादायक खुलासा झाला असून पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.

'नको त्या' अवस्थेत पाहिले अन्...; काँग्रेस शहराध्यक्षाच्या पुतण्याची हत्या; पती-पत्नीने विहिरीत फेकला मृतदेह
Amravati Crime: अमरावतीच्या धारणी ते हरीसाल मार्गावरील उतावली शेतशिवारात बेपत्ता असलेल्या चिंटू उर्फ मो. जुबेर अब्दुल जहूर या भाजी विक्रेत्याच्या हत्येचा थरार समोर आला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून चिंटूची निर्घृण हत्या करून, त्याचा मृतदेह विहिरीत दगडी जात्याच्या पाट्याला बांधून फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास करत आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे.
विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह
२४ डिसेंबर रोजी उतावली येथील एका शेतातील विहिरीत चिंटूचा कुजलेला मृतदेह आढळला होता. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाला दगडी जात्याचे पाटे दोरीने बांधले होते, जेणेकरून मृतदेह पाण्यावर तरंगू नये. चिंटू हा काँग्रेस शहराध्यक्षाचा पुतण्या असल्याने या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि धारणी शहरात खळबळ उडाली होती.
भाजीपाला विक्रीतून निर्माण झाली जवळीक
मयत चिंटू हा ठोक भाजीपाला व्यापारी होता, तर आरोपी बुडा गंगाराम जांभेकर (४९) आणि त्याची पत्नी राणीग्राम येथील एका शेतात राहून भाजीपाला उत्पादन करत होते. भाजीपाला खरेदी-विक्रीच्या निमित्ताने चिंटूची आरोपीच्या पत्नीशी ओळख झाली आणि त्याचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले.
'नको त्या' अवस्थेत पाहिले अन्...
१९ डिसेंबरच्या रात्री आरोपी बुडा जांभेकर याने चिंटूला आपल्या झोपडीवर बोलावले. तिथे त्याने चिंटूला आपल्या पत्नीसोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले. यामुळे राग अनावर झालेल्या बुडाने चिंटूचा दोरीने गळा आवळून त्याला जागीच ठार केले. त्यानंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह शेजारील विहिरीत फेकून दिला.
चिंटू बेपत्ता झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि शेजाऱ्यांच्या चौकशीतून संशयाची सुई बुडा जांभेकरकडे वळवली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या बुडाने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली.
३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी आरोपी पती-पत्नीकडून गुन्ह्यात वापरलेली दोरी, कपडे, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे. शुक्रवारी त्यांना धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.