विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हाट्सपवर लीक, माजी नगरसेवकासह तिघे ताब्यात
By गणेश वासनिक | Updated: May 20, 2023 13:40 IST2023-05-20T13:21:09+5:302023-05-20T13:40:24+5:30
पोलिसांनी मोबाईल केले जप्त, अमरावती विद्यापीठाचे परीक्षा संचालक घटनास्थळी दाखल

विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हाट्सपवर लीक, माजी नगरसेवकासह तिघे ताब्यात
गणेश वासनिक
अमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत उन्हाळी २०२३ परीक्षेत विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा सेमिस्टर चवथे शनिवारी मोबाईलद्वारे व्हाट्सअपवर पेपर लीक करण्यात आला. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक प्रणीत सोनी, भूषण किसन हरकुट, किशोर पिंपळकर या तिघांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्ंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत शनिवारी सकाळी ९ ते १२ या दरम्यान विधी अभ्यासक्रमाच्या लॉ ट्रस्ट विषयाचा सेमिस्टर चवथे पेपर होता. मात्र, पेपर सुरु होण्यापूर्वीच तो मोबाईलवर पोहोचला. तसेच या विषयाच्या झेरॉक्स सुद्धा या तिघांकडे आढळल्याचे बोलले जात आहे. पोलिस याप्रकरणी तपास करीत असून, गुन्हा दाखल व्हायचा आहे. लॉ ट्रस्टचा पेपर लीक झाल्याची माहिती मिळताच अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे यांनी घटनास्थळी धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली.