नागपुरात प्रयोगशाळा सहायिकेने विभागप्रमुख महिलेवर फेकला अमोनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:39 AM2020-01-16T00:39:15+5:302020-01-16T00:40:34+5:30

सदरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये वेतन थांबविल्यामुळे प्रयोगशाळा सहायक महिलेने विभागप्रमुख असलेल्या महिलेवर अमोनिया नावाचे रसायन फेकले.

Ammonia is thrown at the department head by a laboratory assistant in Nagpur | नागपुरात प्रयोगशाळा सहायिकेने विभागप्रमुख महिलेवर फेकला अमोनिया

नागपुरात प्रयोगशाळा सहायिकेने विभागप्रमुख महिलेवर फेकला अमोनिया

Next
ठळक मुद्देशासकीय तंत्रनिकेतनमधील घटना : वेतन थांबविल्यामुळे काढला राग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये वेतन थांबविल्यामुळे प्रयोगशाळा सहायक महिलेने विभागप्रमुख असलेल्या महिलेवर अमोनिया नावाचे रसायन फेकले. सुदैवाने विभागप्रमुख सतर्क असल्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पोलिसात खळबळ उडाली. सदर पोलिसांनी अमोनिया फेकणाऱ्या महिला कर्मचाºयास ताब्यात घेतले. परंतु विभाग प्रमुखांनी तक्रार न केल्यामुळे तिची सुटका करण्यात आली.
अमोनिया फेकणारी महिला प्रयोगशाळा सहायक आहे. ती पूर्वी आयटी विभागात कार्यरत होती. डिसेंबर महिन्यात परवानगी शिवाय कामावर न आल्यामुळे आयटी विभागाच्या प्रमुखांनी प्रयोगशाळा सहायकाचा वरिष्ठांना अहवाल पाठविला होता. यामुळे प्रयोगशाळा सहायक महिलेचे डिसेंबर महिन्याचे वेतन थांबविण्यात आले होते. तिची १ जानेवारीला आयटी विभागातून रसायनशास्त्र विभागात बदलीही करण्यात आली होती. बदली केल्यानंतर ती ६ जानेवारीला नोकरीवर हजर झाली. वेतन थांबविल्यामुळे ती रागात होती. बुधवारी दुपारी १ वाजता आयटी विभागप्रमुख आपल्या कक्षात हजर होत्या. त्यावेळी प्रयोगशाळा सहायक महिला अमोनियाने भरलेला ग्लास घेऊन तेथे पोहोचली. तिने कक्षात प्रवेश करताच विभागप्रमुखावर अमोनिया फेकला. सतर्क असल्यामुळे विभागप्रमुखांनी आपला दुपट्टा समोर केला. यामुळे अमोनिया विभागप्रमुखाच्या शरीराऐवजी दुपट्ट्यावर पडला. अमोनिया फेकल्यानंतर प्रयोगशाळा सहायक तेथून निघून गेली. घटनेची माहिती मिळताच कॉलेज परिसरात खळबळ उडाली. वरिष्ठांनी चौकशी केली असता अमोनिया फेकल्याची माहिती मिळाली. दरम्यान कॉलेजच्या बाहेर अ‍ॅसिड फेकल्याची अफवा पसरल्यामुळे कॉलेजमधील वरिष्ठांचे फोन येणे सुरु झाले. दुपारी २.१५ नियंत्रण कक्षाला अ‍ॅसिडने हल्ला केल्याची सूचना देण्यात आली. नियंत्रण कक्षाने सदर पोलिसांना कळविले. सदरचे ठाणेदार महेश बनसोड सहकाऱ्यांसह शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पोहोचले. त्यांनी आयटी विभागप्रमुखांची चौकशी केली. त्यांनी अमोनिया फेकल्याची माहिती दिली. पोलिसांनी प्रयोगशाळा प्रमुखांची चौकशी केली असता त्यांनी ग्लासमध्ये अमोनिया असल्याचे सांगितले. पोलीस अमोनिया फेकणाºया प्रयोगशाळा सहायक महिलेस ताब्यात घेऊन ठाण्यात आले. त्यांनी विभागप्रमुख महिलेस तक्रार देण्यास सांगितले. परंतु काही वेळानंतर विभागप्रमुख महिलेने तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी प्रयोगशाळा सहायक महिलेची सुटका केली. प्रयोगशाळेत अमोनियासह अनेक रसायन ठेवले होते. प्रयोगशाळा सहायक महिलेने घातक रसायनाने हल्ला केला असता तर गंभीर दुखापत झाली असती.

अनेक दिवसांपासून होती त्रस्त
अमोनिया फेकणारी प्रयोगशाळा सहायक महिला मागील अनेक दिवसांपासून खाजगी कारणांमुळे त्रस्त होती. त्यामुळे ती नियमित कामावर येत नव्हती. वेतन थांबविल्यामुळे तिला राग आला. पोलिसांनी पकडल्यानंतर ती रडत होती. पोलिसांनी तिची समजूत घालून तिला शांत केले. तिची अवस्था पाहून विभागप्रमुखांनी तिच्या विरुद्ध तक्रार केली नसल्याची माहिती आहे.

Web Title: Ammonia is thrown at the department head by a laboratory assistant in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.