आंबोलीत गैरसमजुतीतून जमावाची पोलिसाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 15:14 IST2019-01-03T15:11:10+5:302019-01-03T15:14:09+5:30
यात कॉन्स्टेबलसह एक अधिकारी जखमी झाला असून, या प्रकरणी आंबोली पोलिसांनी एन. खरोडिया (२८) या तरुणाला अटक केली आहे.

आंबोलीत गैरसमजुतीतून जमावाची पोलिसाला मारहाण
मुंबई - विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा बनाव चालकाने आखल्याने गैरसमजुतीतून जमावाने पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार अंबोलीत उघडकीस आला आहे. यात कॉन्स्टेबलसह एक अधिकारी जखमी झाला असून, या प्रकरणी आंबोली पोलिसांनी एन. खरोडिया (२८) या तरुणाला अटक केली आहे.
बुधवारी दुपारी आंबोली पोलिसांकडून विनाहेल्मेट गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. त्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल सागर कोंडविलकर (२८) यांनी खरोडिया याला अडविले आणि दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. मात्र, दंड न भरताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्या वेळी झालेल्या झटापटीत त्याने कोंडविलकर यांच्या हातावर एक जोरदार फटका मारला. त्यामुळे कोंडविलकर यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन त्यांच्या हातातून रक्तस्राव होऊ लागला. त्याच हाताने कोंडविलकर यांनी खरोडिया याचे शर्ट पकडले त्यामुळे त्याचे शर्ट रक्ताने माखले. मात्र त्याने आरडाओरड करीत त्या ठिकाणी जमावाला गोळा केले आणि कोंडविलकर यांनी त्याला मारल्याचा बनाव केला.
जमलेल्या लोकांनाही त्याचा रक्ताळलेला शर्ट पाहून त्याचे बोलणे खरे वाटले. त्यामुळे तेथे जमलेल्या लोकांनी कोंडविलकर यांच्यावर हल्ला चढविला. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पोलीस निरीक्षक सरगर जखमी झाले. तसेच जमावाने पोलिसांच्या एका गाडीची काचदेखील फोडली. अखेर अतिरिक्त मनुष्यबळ मागवत पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आणि खरोडिया याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले. मात्र, या घटनेनंतर पुन्हा पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.