भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:44 IST2025-08-11T11:43:41+5:302025-08-11T11:44:40+5:30
भाजपा नेत्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच खळबळजनक खुलासा केला आहे.

फोटो - ABP News
अजमेरमधील किशनगढ येथे भाजपा नेत्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच खळबळजनक खुलासा केला आहे. या हत्येचा मुख्य आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून महिलेचा पती आणि भाजपा नेता रोहित सैनी होता. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत रोहितने कबूल केलं की, त्याने त्याची पत्नी संजू सैनीची हत्या करण्याचा कट रचला होता.
१० ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. रोहित सैनी त्याच्या चुलत भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी किशनगढला जात होता आणि त्याची पत्नी संजू देखील सोबत होती. रस्त्यात संजूची धारदार शस्त्राने मान कापून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात रोहितही जखमी झाला होता, परंतु नंतर पोलिसांना त्याच्या जखमा संशयास्पद वाटल्या. रोहितने पोलिसांना सांगितलं होतं की, दोन बाईकवरून आलेल्या चार गुन्हेगारांनी लुटण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला केला आणि संजूची हत्या केली.
पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा दरोड्याच्या कथेत अनेक त्रुटी आढळून आल्या. रोहितच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते, परंतु त्याच्या जखमा गंभीर नव्हत्या. रोहितने स्वतःवर हल्ला करून आणि त्याच्या पत्नीचं रक्त कपड्यांवर लावून दरोड्याची खोटी गोष्ट रचल्याचा पोलिसांना संशय होता. परंतू चौकशीत त्याचं सत्य समोर आलं. त्याने सांगितलं की त्याचं त्याच्या पत्नीशी अनेकदा भांडण होत असे, कारण त्याला संशय होता की, संजू दुसऱ्या कोणाशी तरी बोलत आहे. रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी संजूने तिच्या चुलत भावाच्या घरी जाण्याचा आग्रह धरला. रोहितला हे आवडलं नाही.
रोहितने त्याच्या चार साथीदारांसह या हत्येचा कट रचला. तोही हल्ल्यात जखमी झाला आहे हे दाखवण्यासाठी त्याने स्वतःवर हल्ला केला. संजूच्या पालकांनीही सुरुवातीपासूनच रोहितवर संशय व्यक्त केला होता. त्यांनी सांगितलं की तो दररोज संजूवर अत्याचार करत असे. पोलिसांनी रोहितला अटक केली आहे आणि उर्वरित चार आरोपींचा शोध घेत आहेत.