"मम्मा मला दुसऱ्या शाळेत टाक"; मृत अमायराचा ऑडिओ समोर आल्याने खळबळ, आईच्या विनंतीनंतरही केले दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:06 IST2025-11-10T11:01:18+5:302025-11-10T11:06:58+5:30
जयपूरच्या शाळेतील ९ वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणात नवं वळण आलं आहे.

"मम्मा मला दुसऱ्या शाळेत टाक"; मृत अमायराचा ऑडिओ समोर आल्याने खळबळ, आईच्या विनंतीनंतरही केले दुर्लक्ष
Jaipur School Girl Death: जयपूरच्या नीरजा मोदी स्कूलमध्ये शिकणाऱ्या ९ वर्षांच्या अमायरा नावाच्या विद्यार्थिनीचा १ नोव्हेंबर रोजी शाळेच्या इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर, अमायराच्या आई आणि तिच्यामध्ये झालेल्या एका हृदयद्रावक फोन संभाषणाची रेकॉर्डिंग समोर आली आहे. यानंतर मुलीच्या मृत्यूमागे शाळेतील छळवणूक आणि शालेय प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष असल्याचे आरोप पालकांनी केले आहेत. या रेकॉर्डिंग आणि पालकांच्या तक्रारीमुळे, संपूर्ण जयपूरसह देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. अमायराच्या कुटुंबीयांनी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
'मला दुसऱ्या शाळेत टाका'
अमायराचा मृत्यू होण्यापूर्वी जुलै २०२४ मध्ये तिची आणि तिच्या आईची झालेली फोनवरील बातचीत समोर आली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये अमायरा शाळेत जाण्यास नकार देत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते. "मम्मा, मला शाळेत जायचं नाहीये. सगळे मला त्रास देतात. दररोज कोणी ना कोणी माझ्याबद्दल तक्रार करतं. प्लीज, मला इथून बाहेर काढा. मला दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घ्या. मी हे आणखी सहन करू शकत नाहीये," अशी विनवणी अमायरा आपल्या आईकडे करत असल्याचे या ऑडिओमध्ये रेकॉर्ड झाले आहे. यानंतर अमायराच्या आईने हा ऑडिओ आणि छळवणुकीबद्दलची चिंता तिची वर्गशिक्षिका व शाळा प्रशासनाला कळवली होती.
शिक्षकांचे दुर्लक्ष आणि पालकांचा आरोप
अमायराच्या आईने वर्गशिक्षकांना पाठवलेल्या मेसेजचा एक स्क्रीनशॉटही समोर आला आहे. त्या मेसेजमध्ये तिने, "सर्वांनाच तिचा (अमायराचा) त्रास होत आहे. ती घाबरली आहे आणि उद्यापासून तिला शाळेत जायचे नाही,"असे लिहिले होते. पालकांचा आरोप आहे की, इतकी स्पष्ट तक्रार करूनही शिक्षकांनी या मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि कोणतीही कारवाई केली नाही.
अमायराचे वडील विजय यांनी शिक्षकांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, एका पालक-शिक्षक बैठकीत एका मुलाने आपल्या मुलीकडे धमकावणारे हावभाव केले होते. याबाबत तक्रार केल्यावर शिक्षकांनी, "अमायराने समजून घ्यावं की ही अनुदानीत शाळा आहे," असे उत्तर दिले होते.
१ नोव्हेंबर रोजी अमायरा नीरजा मोदी स्कूलच्या चौथ्या मजल्यावरील कठड्यावर चढून सुमारे ४८ फूट खाली पडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली. तिला तातडीने रुग्णालयात नेले असता, दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. अमायराच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी शाळेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पालकांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी, अमायरा पडलेली जागा स्वच्छ करण्यात आली होती आणि तिथे रक्ताचे कोणतेही डाग आढळले नाहीत, असेही पोलिसांनी नमूद केले. पालक संघटनेने देखील अमायरावर मागील एक ते दोन वर्षांपासून बुलिंग सुरू असल्याचा आरोप करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या हे प्रकरण अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असल्याचा आरोप कुटुंबाने केला असून, न्याय मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. शाळेकडून या घटनेवर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.