उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदूर येथील भाजपा नेते आपल्या आईच्या अस्थी घेऊन हरिद्वारला जात होते, तेव्हा ट्रेनमध्ये अस्थी असलेला कलश चोरीला गेला. जेव्हा सर्वजण जागे झाले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. भाजपा नेत्याने चालत्या ट्रेनमध्ये अलार्म वाजवला तेव्हा इतर प्रवाशांनी चोराला पकडलं आणि त्याला धडा शिकवला. ट्रेन आग्रा पोहोचल्यावर चोराला जीआरपीच्या ताब्यात देण्यात आलं.
ऋषिकेश एक्सप्रेस आग्रा कॅन्ट स्टेशनवर पोहोचताच स्टेशनवर गोंधळ उडाला. इंदूर येथील भाजपा नेते देवेंद्र इनानी यांच्या आईच्या अस्थी असलेला कलश ट्रेनमध्ये चोरीला गेला. भाजपा नेते त्यांच्या आईच्या अस्थी विसर्जनासाठी हरिद्वारला घेऊन जात होते. देवेंद्र जागे झाल्यावर त्यांनी अलार्म वाजवला ज्यामुळे प्रवाशांच्या मदतीने चोराला रंगेहाथ पकडण्यात आलं. रंगेहाथ पकडलेल्या चोराला आधी मारहाण करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर येथील भाजपा नेते देवेंद्र इनानी त्याच्या कुटुंबातील ९ सदस्यांसह ऋषिकेश एक्सप्रेसमध्ये होते. २० जुलैच्या रात्री ते इंदूरमधील लक्ष्मीबाई नगर स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढले. पहाटे ४.०० वाजता, मोरेना आणि आग्रा कॅन्ट स्टेशन दरम्यान, एक माणूस शेजारील एस-४ वरून त्याच्या एस-२ कोचमध्ये घुसला आणि बॅग पळवू लागला.
इनानी जागे झाले. भाजपा नेत्याचा आवाज ऐकून इतर प्रवासीही जमले आणि त्यांनी आरोपीला मारहाण केली. झडती घेतली असता त्यांना शौचालयात दोन पर्स सापडल्या. आरोपीला आग्रा कॅन्ट येथील जीआरपीच्या स्वाधीन करण्यात आलं. पोलीस त्याचा मागील गुन्हेगारी रेकॉर्ड तपासत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.